सकाळी ११:४५ला सुरु होणाऱ्या कार्यक्रमासाठी सकाळी ८ पासून येऊन थांबलेले रसिक, रमणबागेच्या बाहेरच्या रस्त्यावर किलोमीटरभर लांब रांग, सुरक्षाव्यवस्थेसाठी नेहमीपेक्षा दुप्पट तयारी, आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरचं पार्किंग फुल्ल आणि मंडपाच्या आत जाण्यासाठी रसिकांची उडालेली झुंबड!!
हे आहे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाचं वर्णन. स्वर्गीय सूर अनुभवण्याची शेवटची संधी, रविवार आणि मोठ्या मोठ्या प्रथितयश कलाकारांचे सादरीकरण असा तिहेरी योग असताना अलोट गर्दी होणं साहजिकच होतं. अशा गर्दीतून वाट काढत सर्व रसिकांनी आपापल्या आवडीच्या जागा पटकावल्या आणि पहिल्या गायकाची म्हणजेच महेश काळेची आतुरतेने वाट पाहू लागले.
महेश काळे येताच त्याचं अगदी जल्लोषात स्वागत झालं. त्याची लोकप्रियता पाहता ते अगदी अपेक्षित असंच होतं. "माझ्या वयापेक्षाही जास्त काळ संगीत ऐकणारे श्रोते इथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत." असे सवाईच्या श्रोत्यांबद्दल गौरवोद्गार काढून त्याने गायनास सुरुवात केली. आजच्या सादरीकरणासाठी त्याने राग शुद्ध सारंगची निवड केली होती. सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात त्याने आपल्या ढंगदार गायनाने वातावरणाचा ताबा घेतला. त्याचे गुरु पं. जितेंद्र अभिषेकी यांना उद्देशून त्याने रचलेल्या बंदिशींचे त्याने सादरीकरण केले. बुवांना उद्देशून त्यात 'श्यामरंग' असा असा शब्द वापरला होता. आपल्या सादरीकरणात त्याने वैविध्यपूर्ण गायकीचे प्रदर्शन घडवले. राग सादर करून झाल्यावर रसिकाग्रहास्तव त्याला वेळ वाढवून देण्यात आली. वाढीव वेळात त्याने अवघे गर्जे पंढरपूर हा अभंग व कट्यार काळजात घुसली चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारे गीत 'अरुणी किरणी' गाऊन पुन्हा एकदा रसिकांची मने जिंकून घेतली.
महेशला तबल्यावर निखिल फाटक, पखवाजला प्रसाद जोशी, व्हायोलिनवर जेष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे, हार्मोनियमवर राजीव तांबे, तंबोऱ्याला प्रह्लाद जाधव व पूजा कुलकर्णी यांची तर टाळाला अर्थातच माउली टाकळकर यांची साथ लाभली.
![]() |
महेश काळे - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून |
महेश काळे याच्या अंगावर शहारे आणणाऱ्या सादरीकरणानंतर स्वरमंचावर पद्मा शंकर यांचे आगमन झाले. कर्नाटकी पद्धतीने व्हायोलिन सादर केलेल्या पद्मा यांना रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मृदंगम आणि तबल्याच्या साथीने त्यांनी राग हंसध्वनी रंगवला. साथीदारांना पुरेपूर वाव देत केलेले सादरीकरण हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. कर्नाटकी संगीताच्या वेगळेपणाचा त्यांच्या सादरीकरणात पुरेपूर प्रत्यय आला. हंसध्वनीनंतर त्यांनी संत त्यागराजा यांनी एक रचना वाजवली. पं. भीमसेन जोशी यांना अभिवादन म्हणून त्यांनी 'माझे माहेर पंढरी' हा अभंग देखील सादर केला. यानंतर रसिकांनी वन्स मोअर दिल्याकारणाने त्यांनी भीमसेनजींचाच 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' हा अभंग व्हायोलिनवर सादर करून मंचाचा निरोप घेतला.
पुढील सादरीकरण सुधाकर चव्हाण यांच्या गायनाचे होते. त्यांना तबल्यावर नंदकिशोर ढोरे, हार्मोनियमवर प्रभाकर पांडव, पखवाजवर गंभीरमहाराज आणि टाळला सर्वेश बादरयाणी यांची साथ लाभली. रागसादरीकरणांनंतर त्यांनी 'ज्ञानियांचा राजा' हा अभंग गाऊन दाखवला. यावेळी जणू त्यांच्या दमदार आवाजाला भक्तीरसातील गोडव्याचं कोंदण लाभल्याचा भास झाला.
त्यापुढील सत्रात राजन कुलकर्णी व त्यांचे पुत्र सारंग कुलकर्णी यांनी सरोदवादन केले. या सादरीकरणासाठी त्यांनी राग वाचस्पतीची निवड केली. तबल्यावर निशिकांत बडोदेकर तर पखवाजवर ओंकार दळवी यांनी त्यांना साथ-संगत केली. रसिकांना खिळवून ठेवणाऱ्या या सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
पुढील सादरीकरण हे रसिकांना आस लागून राहिलेल्या आनंद भाटे यांचं होतं. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेल्या भाटे यांनी राग यमन कल्याण गात मैफलीस सुरुवात केली. अत्यंत सुमधुर अशा आवाजात उत्तरोत्तर रंगत गेलेलं सादरीकरण हा दिवसाचा परमोच्च बिंदू होता. शेवटी 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' हा कन्नड अभंग सादर करून भाटे यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. सकाळी व्हायोलिनवर ऐकलेलं गीत संध्याकाळी साक्षात आनंदगंधर्वांच्या तोंडून ऐकणं हि रसिकांसाठी सुखाची पर्वणी होती. भाटे यांना तबल्यावर भरत कामत तर हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर यांची साथ लाभली. तंबोरा सांभाळायला विनय चितराव व मुकुंद बादरायणी सज्ज होते. अभंगाच्या वेळी टाळाची साथ करायला माउली टाकळकर यांनी हजेरी लावली. माउलींचा उत्साह बघून आनंदगंधर्वांच्या तोंडून हे ९१ वर्षाचे नसून १९ वर्षांचेच आहेत असे उद्गार निघाले!
भाटेंच्या दैवी सादरीकरणाला वन्स मोअर देण्याचा रसिकोत्साह पाहून श्रीनिवास जोशी यांनी 'आनंद आपलाच आहे, परत कधीतरी नक्की गाईल' असं सांगत, वेळ पाळली नाही तर आम्हाला बुजुर्गांचे फटके खावे लागतात या सत्याची जाणीव करून दिली.
भाटेंच्या दैवी सादरीकरणाला वन्स मोअर देण्याचा रसिकोत्साह पाहून श्रीनिवास जोशी यांनी 'आनंद आपलाच आहे, परत कधीतरी नक्की गाईल' असं सांगत, वेळ पाळली नाही तर आम्हाला बुजुर्गांचे फटके खावे लागतात या सत्याची जाणीव करून दिली.
![]() |
आनंद भाटे - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून |
पुढच्या सत्रात उस्ताद शुजात खां यांनी सतारवादन केले. दोन तबलजी घेऊन वादन करण्याचा अनोखा प्रयोग त्यांनी केला. राग झिंझोटीचे बहारदार सादरीकरण हा रसिकाकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शेवटी सतारवादनासोबतच गात गात त्यांनी एक गझल सादर केली. त्यांच्या लौकिकास साजेसे असेच त्यांचे सादरीकरण ठरले.
![]() |
ठेवा! |
शेवटचे सादरीकरण किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका श्रीमती प्रभा अत्रे यांच्या गायनाचे होते. मी त्या सादरीकरणासाठी थांबू शकलो नसल्याने त्याविषयी लिहू शकत नाही. परंतु प्रभाताईंनी राग जोगकंसची मांडणी केली असे कळते.
रसिकांना श्रवणसुखाचा परमोच्च आनंद देऊन ६५व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली. देशोदेशीच्या शास्त्रीय संगीताच्या उपासकांसाठी शिरस्थ असलेल्या या संगीतसोहळ्याचा आज समारोप झाला. आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचं किती महत्व असू शकतं याची जाणीव करून देणाऱ्या या पाच दिवसांची आज सांगता झाली. अनेक संगीतोपासकांना, अभ्यासकांना, रसिकांना आणि अभिजात शास्त्रीय संगीताच्या दैदिप्यमान परंपरेला या महोत्सवाने काय आणि किती दिलं आहे हे शब्दांत मांडता येत नाही.
काही गोष्टींसमोर नतमस्तक व्हायचं असतं, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या याबद्दल देवाचे शतशः आभार मानत. सवाईविषयी याहून वेगळी कुठलीच भावना नाही!
- रजत जोशी
No comments:
Post a Comment