एखाद्या दिवसाची आपण बऱ्याच काळापासून अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो दिवस आल्यावर आपली अवस्था अगदी 'अजि सोनियाचा दिनु' अशी होते. सवाईचा दुसरा दिवस अनेक रसिक श्रोत्यांसाठी असाच काहीसा होता. तब्बल ४ वर्षांनंतर 'सवाई'त परतून आलेल्या कौशिकी चक्रबोर्ती आणि तब्बल १२ वर्षांनंतर आपले सादरीकरण करणाऱ्या कला रामनाथ ह्या आजच्या दिवसाच्या प्रमुख आकर्षण होत्या.
आजचा दिवस पहिल्या दिवशीसारखा ३ वाजता न सुरु होता, ४ वाजता सुरु झाला. पं. कुमार गंधर्व ह्यांचे नातू आणि मुकुल शिवपुत्र ह्यांचे पुत्र असलेले भुवनेश कोमकली ह्यांनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. आपल्या दमदार आवाजात राग मुलतानीमधील बंदिश गात त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. त्यानंतर त्यांनी माळवा आळवून आपल्या मैफलीची सांगता केली.
पुढचे सादरीकरण हे कला रामनाथ ह्यांच्या व्हायोलिनवादनाचे होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आपले अढळ स्थान प्राप्त केलेल्या व्हायोलिनच्या उपासकांमध्ये 'कला रामनाथ' हे नाव अग्रस्थानी घ्यावे असेच आहे. आजच्या मैफलीसाठी कला ह्यांना तबल्यावर पं. योगेश समसी ह्यांची साथ लाभली. आपल्या सादरीकरणाची सुरुवात त्यांनी राग शामकल्याणने केली. व्हायोलिनवरचे प्रभुत्व क्षणोक्षणी सिद्ध करत त्यांनी वातावरण भारून टाकले. शेवटी एक कजरी सादर करून त्यांनी आपली मैफल संपवली. कला रामनाथ ह्यांच्या वादनासाठी त्यांचे गुरुबंधू शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर उपस्थित होते.
यापुढचे बहुप्रतीक्षित सत्र हे कौशिकी चक्रबोर्ती ह्यांचे होते. त्यांच्या सादरीकरणाला सुरुवात होताच रमणबागेच्या मैदानाबाहेर फटाके वाजू लागले. ते ऐकून कौशिकी ह्यांनी 'बाहेरील लोकांनाही आनंद झाला आहे' अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग मारुबिहागने केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ह्या मैफलीत चक्रबोर्ती ह्यांनी आपल्या गायनातून मारुबिहागमधील बंदिशीसोबतच सरगमदेखील गाऊन रसिकांना तृप्त केले. गाण्याबरोबरच त्यांचे चेहऱ्यावरचे प्रफुल्लित करणारे भाव ह्या मैफलीचे आकर्षण ठरले. मारुबिहागनंतर त्यांनी राग बागेश्री गायला. शेवटी श्रोत्यांच्या विनंतीला मान देऊन कौशिकी ह्यांनी 'याद पिया कि आये' ह्या ठुमरीने आपली मैफल समाप्त केली. ह्या सादरीकरणासाठी पुण्यातील प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी उपस्थित होते.
कौशिकी ह्यांच्या सत्रानंतर संगीतमार्तंड पं. जसराज ह्यांचे गायन झाले. वयाच्या ८७व्या वर्षीदेखील त्यांनी अफाट ऊर्जेने केलेले सादरीकरण रसिकांच्या कौतुकाचा विषय ठरले. त्यांनी आपल्या मैफलीत राग शंकराचे सादरीकरण केले. एक भजन गाऊन त्यांनी आपल्या गायनाचा व दुसऱ्या दिवसाचा समारोप केला.
![]() |
श्रीमती कला रामनाथ - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून |
![]() |
कौशिकी चक्रबोर्ती - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून |
संगीत हे मनुष्याचे आनंदनिधान असते. 'सवाई'च्या मैफलीत मोठमोठ्या गायक, वादक, जाणकार किंवा अभ्यासकांबरोबरच सामान्य, शास्त्रीय संगीत न कळणाऱ्या परंतु ते मनापासून आवडणाऱ्या श्रोत्यांची उपस्थिती असते. त्यांच्यासाठी तो एक आनंदाचा वाहता झराच असतो. हे ५ दिवस त्यांना पुढच्या संपूर्ण वर्षासाठी ऊर्जा देत असतात. 'सवाई'च्या मंचाची, जागेची, वातावरणाची किंवा एकंदर माहोलाचीच ही अनुभूती असते.
- रजत जोशी
(सवाईच्या एका फॅन-पेज साठी लिहिलेलं वृत्त.)१. पहिल्या दिवसाचे वृत्त
३. तिसऱ्या दिवसाचे वृत्त
४. चौथ्या दिवसाचे वृत्त
५. पाचव्या दिवसाचे वृत्त
No comments:
Post a Comment