डिसेंबरचा 'तो' दिवस... रमणबागेच्या भल्यामोठ्या मैदानावर उभारलेला तो राजेशाही मंडप... दुपार होताच तिकडे वळू लागलेली असंख्य पावलं... हळूहळू गर्दीने फुलून जाणारा तो परिसर... आणि ३च्या ठोक्याला सर्वांच्या कानी पडलेला तो चिरपरिचित आवाज, 'रसिकहो नमस्कार!'
पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेतलं मानाचं पान म्हणजे 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'! ६५व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरुवात ही अशीच काहीशी झाली. खरंतर 'सवाई'ची सुरुवात डिसेंबरच्या दुसऱ्या बुधवारी होतच नसते. ती होत असते नोव्हेंबरच्या मध्यावर, जेंव्हा सर्व दर्दी रसिकांचं लक्ष लागून असलेली कलाकारांची यादी प्रसिद्ध होते. त्या क्षणापासून ते सवाईमंडपात स्थानापन्न होण्याच्या क्षणापर्यंत सर्वांच्या मनात ह्यावर्षीच्या 'सवाई' बद्दलची उत्सुकता घर करून असते.
२०१७च्या महोत्सवाची सुरुवात मधुकर धुमाळ ह्यांच्या सनईवादनाने झाली. धुमाळ ह्यांनी भीमपलास रागाने त्यांची मैफल सजवली. मंत्रमुग्ध करणाऱ्या ह्या सादरीकरणानंतर संगीत वाद्यांचे विक्रेते मिरजकर ह्यांच्याकडून आर्य संगीत प्रसारक मंडळाला ४ तानपुरा जोड भेट म्हणून मिळाले. त्यावर सवाई गंधर्व व पं. भीमसेन जोशी ह्यांची चित्रे सोन्याने एम्बॉस केलेली होती. अशाप्रकारचं रसिकांचं, जाणकारांचं किंवा कलाकारांचं मिळणारं प्रेम हे 'सवाई'चं वैशिष्ट्यच आहे.
यापुढील सादरीकरण हे डॉ. विजय रजपूत ह्याचं होतं. डॉ. रजपूत हे भीमसेन जोशींचे शिष्य आहेत. गायनाची सुरुवात करण्यापूर्वीच "जितना संगीत सिखा है वो आज के इस कार्यक्रम के लिये ही सिखा है।" अशा शब्दात नम्रतेचे प्रदर्शन घडवत त्यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. आपल्या मैफलीत पुरिया कल्याण आळवत त्यांनी त्यांच्यातल्या तयारीच्या गवयाचे दर्शन घडवले.
डॉ. रजपूत यांच्या गायनानंतर देबाशिष भट्टाचार्य ह्याचं चतुरंगी म्हणजेच, स्लाईड गिटार वादन होतं. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ह्या सादरीकरणाचं वर्णन 'आजच्या दिवसातील सर्वोत्तम' असेच करता येईल. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या ह्या सादरीकरणाने सर्वांचीच वाहवा मिळवली.
पुढील भागात बनारस घराण्याचे जेष्ठ गायक-बंधू राजन व साजन मिश्रा ह्यांचे गायन झाले. मिश्रा बंधूंनी पुरिया राग आळवला. इतक्या वर्षांच्या तपस्येने आलेला अनुभव व संगीताप्रती असलेली निष्ठा त्यांच्या सादरीकरणातून पदोपदी जाणवत होती. देशमुखांच्याच भाषेत सांगायचं झालं तर स्वरयंत्र २ असली तरी स्वर मात्र एकच निघत होता.
यापुढचे आणि दिवसातील शेवटचे सादरीकरण म्हणजे पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया ह्यांचे बासरीवादन. ह्या सादरीकरणापूर्वी हरिजींच्या हस्ते शिवकुमार शर्मा व खुद्द हरिजी ह्या शिव-हरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संगीतातील ख्यातनाम जोडीची छायाचित्र असलेली एक दिनदर्शिका प्रकाशित झाली. आपल्या मिश्किल शैलीत हरिजींनी त्या दिनदर्शिकेवर काही टिप्पणीदेखील केली. हरिजींना साथसंगत करण्यासाठी मोठे कलाकार उपस्थित होते. तबल्यावर विजय घाटे, पखवाजवर भवानी शंकर आणि बासरीची साथ करायला त्यांच्याच शिष्या देबोप्रिया व शिष्य वर्तक उपस्थित होत्या. बासरीवादनाची सुरुवात राग बिहागने करण्यात आली. अत्यंत सुमधुर असा राग बिहाग, हरिजी व विजय घाटे ह्यांच्या खिळवून ठेवणाऱ्या जुगलबंदीबरोबरच संपला. त्यानंतर श्रोत्यांच्या इच्छेला मान देऊन हरिजींनी पहाडी धून आळवली. रात्रभर वाजवत राहण्याची तीव्र इच्छा असूनही तसे करता येत नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. सादरीकरणाचा समारोप आरतीने झाला.
१० ची वेळ पाळत 'सवाई'चा पहिला दिवस संपन्न झाला. दिवसभर ऐकलेले सूर डोक्यात घोळवत, संगीताच्या अथांग सागराला शरण जात श्रोते आपापल्या घरी रवाना झाले, ते उद्याच्या दिवसाची उत्सुकता मनात ठेऊनच!
![]() |
देबाशिष भट्टाचार्य - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून |
![]() |
पं. हरिप्रसाद चौरसिया - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून |
- रजत जोशी
(सवाईच्या एका फॅन-पेज साठी लिहिलेलं वृत्त.)
सुंदर वर्णन!!
ReplyDeleteअनेक अनेक धन्यवाद!
Deleteब्लॉगवर स्वागत! पुढील दिवसांची वर्णनं आणि इतर ब्लॉग वाचण्यासाठी पुनःपुन्हा भेट देत रहा.
मस्तच
ReplyDeleteधन्यवाद!!
Delete