Sunday, December 17, 2017

सवाई २०१७ । दिवस चार


अभय सोपोरी यांचे मंत्रमुग्ध करणारे संतूरवादन, आरती अंकलीकर यांची अनुभवी आणि उत्तरोत्तर खुलत गेलेली गायन-मैफल आणि प्राची शहा यांचं कथक नृत्य अशा अनेकविध रंगांनी सजलेला आजचा चौथा दिवस!


आजच्या दिवसाची सुरुवात बंगाली गायक पं. तुषार दत्त यांच्या गायनाने झाली. तुषार दत्त यांनी राग गौड सारंग गाऊन आपल्या मैफलीला सुरुवात केली. अत्यंत शांत व संयमी सुरांत त्यांनी गौड सारंगचं सोनं केलं. त्यांनंतर त्यांनी शिवरंजनी मधली एक रचना सादर केली. प्रभावी पद्धतीने तबला वाजवत प्रशांत पांडव यांनी तुषार दत्त यांना समर्पक साथ दिली. शेवटी एक भजन गाऊन त्यांनी समारोप केला. यावेळी हार्मोनियमच्या साथीला अविनाश दिघे आणि टाळ वाजवायला अर्थातच माऊली टाकळकर होते.


पुढील सादरीकरण हे पं. भजन सोपोरी यांचे पुत्र अभय सोपोरी यांच्या संतूरवादनाचे होते. वस्तुतः पं. भजन सोपोरी हे सुद्धा या मैफलीत सहभागी होणार होते, परंतु काही कारणाने होऊ शकले नाहीत. अभय सोपोरी यांनी आजच्या सादरीकरणासाठी राग भीमची निवड केली होती. सुरुवातीला आपला स्वरविचार सांगून व रागाची मांडणी कशी आहे, कल कसा आहे हे समजावून सांगत त्यांनी सुरुवात केली. त्यांना तबल्याला उस्ताद अक्रम खान यांची तर पखवाजवर ऋषी शंकर उपाध्याय यांची साथ लाभली. मधूनच बंदिश गात त्यांनी अनोख्या पद्धतीने रागाचे सादरीकरण केले. सादरीकरणाच्या मध्यावर तबला व पखवाजशी जुगलबंदी करत त्यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. रसिकांना दैवी सुरांची अनुभूती देऊन त्यांनी मैफलीचा समारोप केला. वादन थांबताच रसिकांकडून वन्स मोअर येण्याआधीच आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी स्वरमंचावर येऊन अभय सोपोरी यांना अजून थोडा वेळ सादर करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत सोपोरी यांनी काश्मिरी संगीतातील काही ऐकवण्याची तयारी दर्शवली. एक सुफी तराणा वाजवून त्यांनी श्रोत्यांना जणू स्वरानंदाची पुनरानुभूतीच दिली. सर्वार्थाने परिपूर्ण अशा सादरीकरणानंतर रसिकांकडून झालेल्या अमाप कौतुकाचा अत्यंत नम्रतेने स्वीकार करून त्यांनी स्वरमंचाचा निरोप घेतला.


सोपोरी यांच्या उत्कृष्ट सादरीकरणानंतर तितक्याच ताकदीचे गायक पं. उपेंद्र भट स्वरमंचावर दाखल झाले. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेल्या उपेंद्र भट यांनी आजच्या मैफलीसाठी राग दुर्गाची निवड केली. वस्तुतः राग दुर्गा हा रात्रीच्या प्रहरी गायला जाणारा राग आहे, परंतु सवाईच्या श्रोत्यांना ऐकायला मिळावा म्हणून भट यांनी हा राग संध्याकाळीच गायचं ठरवलं. "आवडलं तर गुरूंचा आशीर्वाद आणि चुकलं तर माझीच तपस्या कमी पडली." अशा नम्र शब्दांत त्यांनी सादरीकरणाची सुरुवात केली. भट यांनी अत्यंत जोशपूर्ण पद्धतीने गायनास सुरुवात केली. पदोपदी त्यांच्यातल्या ऊर्जेचा प्रत्यय श्रोतृवर्गास येत होता. श्रोत्यांना खिळवून ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेचे प्रदर्शनच घडत होते. राग दुर्गा नंतर त्यांनी 'अवघा आनंदी आनंद' हा अभंग गाऊन मैफलीची सांगता केली. यावेळी तबल्याच्या साथीला विवेक भालेराव, हार्मोनियमवर उमेश पुरोहित व सारंगीच्या साथीला दिलशाद खां होते.

दिवसाच्या पुढच्या टप्प्यात आजचे प्रमुख आकर्षण असलेल्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या शिष्या आरती अंकलीकर टिकेकर यांचे गायन होते. आरतीताईंनी आपल्या सादरीकरणासाठी राग रागेश्रीची निवड केली. आपल्या गायनातून एकेक सूर उलगडून दाखवत त्यांनी मैफल रंगवत नेली. एखाद्या अभ्यासू कलाकाराच्या सादरीकरणातून त्याचा अभ्यास कसा दिसतो याचे मूर्तिमंत उदाहरणच जणू आरतीताईंनी प्रदर्शित केले. रागाच्या सादरीकरणानंतर त्यांनी हिंदी भाषेतील एक टप्पा गाऊन दाखवला. शेवटी 'बोलावा विठ्ठल' हा अभंग गाऊन त्यांनी मैफल समाप्त केली.

पुढचे सादरीकरण प्राची शहा यांच्या कथक नृत्याचे होते. दिसायला खूप छान आणि खिळवून ठेवणारे सादरीकरण याखेरीज या नृत्याविषयी मी फार काही लिहू शकत नाही. शेवटी पद्मा तळवलकर यांचे गायन होते. जरी या सादरीकरणाला मी थांबलो नव्हतो, तरी त्यांनी फार सुरेल पद्धतीने राग भूप गायला अशी वार्ता कानी आलेली आहे.

संगीत हा सवाईचा गाभा असला तरी इथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात. मंडपाची सजावट, खाण्याचे स्टॉल्स (सवाईला 'खाणं आणि गाणं' असं म्हणलं जातं. यावरूनच समजून घ्या!), विविध कॅलेंडर, डायऱ्या, सीडी, चित्रे यांची प्रकाशन, विविध प्रकारचे रसिक इत्यादी गोष्टी सवाईच्या एकंदर माहोलाचाच भाग बनत असतात. सध्या स्वरमंडपाच्या मागच्या बाजूला सतीश पाकणीकर यांनी काढलेल्या फोटोंचे 'ग्लोरी ऑफ स्ट्रिंग्स' नावाचे अफलातून प्रदर्शन भरले आहे. खाण्याच्या स्टोल्स वर हुरडा, चायनीज, उकडीचे मोदक इत्यादी विविध पदार्थांना रसिकांची पसंती मिळत आहे. या सगळ्या गोष्टींचा उद्या शेवटचा दिवस आहे, तेंव्हा गाण्याबरोबर याचाही आनंद घ्यायला विसरू नका...

Image may contain: 1 person, smiling, playing a musical instrument and standing
अभय सोपोरी - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

Image may contain: 2 people, people on stage
आरती अंकलीकर - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून


- रजत जोशी

No comments:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *