Monday, March 13, 2017

प्रिय!


प्रिय मुलास,

वरच्या वाक्यात 'प्रिय' लिहीताना हात अडखळला. 'प्रिय' कोणास लिहावे याचे काही ठोकताळे माझ्या मनात आहेत. ज्या व्यक्तीला आपण अप्रिय तर झालो नाही ना, अशी शंका येते त्यालाच प्रिय लिहून आश्वस्त करावं असं माझं मत आहे. पण मुलाला प्रिय लिहीण्याचं काही कारण सापडेना. पण मग दुसरं काय लिहावं तेही सुचेना. मग शेवटी लिहीलंच आणि केली सुरुवात.

नमनालाच घडाभर तेल घालवून ही आज आपल्याला काय सांगणार आहे याची उत्सुकता तुला वाटत असेल. पत्राच्या या टप्प्यावर असलेले तुझे आश्चर्यमिश्रित कुतुहलमिश्रित उत्सुक भाव मला पत्र लिहीतानाच जाणवतायत. का नाही जाणवणार? आईला सग्ग्गळं कळत असतं. मुलाच्या भावनांपासून त्याच्या वेदनांपर्यंत. सगळं!

तुला आठवतंय? लहानपणी शाळेत असताना तू एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होतास. 'माझी आई' असा त्या निबंधाचा विषय होता. तू त्यात किमान २० वेळा 'माझी आई जगातली सर्वात चांगली आई आहे' अशा आशयाचं वाक्य लिहिलं होतंस. जेमतेम ३०-३५ ओळींच्या निबंधात २० वाक्यं हिच लिहील्यावर अर्थातच तुझा निबंध स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला होता. तुझा तो हरलेला चेहरा मला अजुनही आठवतो. माझी आई टिचरच्या पण आईपेक्षा चांगली आहे हे टिचरला आवडलं नसेल अशी तुझी तक्रार होती. मी तुझा निबंध वाचला. माझ्या डोळ्यातून खळ्ळकन पाणीच आलं. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून तू म्हणालास, आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी पुढच्या वेळेला अजून चांगला निबंध लिहीन. पण खरं सांगू, हरल्याचं दु:ख नव्हतंच मला. माझ्यासाठी तुझाच निबंध सर्वोत्तम होता. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' किंवा 'जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसि' असली वाक्य छापून पहिलं बक्षिस मिळवणाऱ्याचा हेवा नव्हताच मला. मला कौतुक होतं ते तुझ्या निरागसतेचं. मनातली निरागसताच मनातलं प्रेम जपत असते याची जाणीव मला त्या दिवशी झाली होती.

तुला माहीतीये? मी क्रिकेटची मॅच का बघते? त्या कोहलीने मारलेल्या फोरचं किंवा धोनीने मारलेल्या सिक्सचं मला काहीच नसतं. पण त्याने फोर मारल्यावर तुझ्या तोंडावरचा ओसंडून वाहणारा आनंद मला महत्वाचा असतो. खरंतर माझं मॅचकडे लक्ष नसतंच मुळी. माझं लक्ष असतं तुझ्याकडे. तुझ्या आनंदाकडे. ज्या आनंदाची मी चाहती आहे, ज्या आनंदाची मी भुकेली आहे, त्या आनंदाकडे.

हे पत्र लिहीणं म्हणजे खरंतर आठवणींचा प्रवासच आहे. तुझ्या जन्मापासून ते अगदी कालपर्यंतच्या आठवणींचा झरा माझ्या मनात वाहतो आहे. तू जेंव्हा पहिल्यांदा 'आई' बोललास, जेंव्हा पहिल्यांदा चालायला लागलास, जेंव्हा पहिल्यांदा शाळेत गेलास, तुझे पहिले मित्र, तुझ्या सगळ्या आठवणी, अगदी सगळं सगळं कसं लख्ख आठवतंय. आठवतायत ते क्षण तुझ्या आनंदाचे, तुझ्या उत्साहाचे अन् आश्चर्याचे, नि तेही, तुझ्या पराभवाचे, अपमानाचे आणि रडवेल्या चेहऱ्यांचे. तू पहिल्यांदा सायकल चालवलीस त्या क्षणापासून ते काल रात्री विमानात बसून दूर देशी निघून जाण्याच्या क्षणापर्यंत. सगळं आठवतंय. अगदी स्पष्ट!

नाही. कालवाकालव नाही, उदासीनता नाही, हृदयात आहे, फक्त पोकळी. आजवर केवळ तुझ्या अस्तित्वाने व्यापलेल्या माझ्या आयुष्यात तुझ्याच जाण्याने बनलेली पोकळी. या पोकळीची, या एकटेपणाचीही सवय होईल काही दिवसांनी. पण ती पोकळी विरणार मात्र नाही. ती तशीच असेल. माझ्या मनात. कायमच.

हे पत्र लिहीण्यामागे emotional blackmail करण्याचा हेतू नाही. 'कायमचा जातो आहे. परत कधीच येणार नाही' या तुझ्या निर्धाराला सुरुंग लावण्याचाही हेतू नाही. विमानतळावर तू हट्टाने रोखलेल्या अश्रुंना पाझर फोडणे हाही हेतू नाही. मनातल्या तळमळीचं रुपांतर हळहळीत होण्यापूर्वीच तीला कागदावर उतरवण्यासाठी हे पत्र.

मला तुला परत बोलवायचं नाही, मला तुझ्या प्रगतीच्या आड यायचं नाही, मला माझ्या भावना तुझ्यावर लादायच्या नाहीत, किंबहुना मला तुला कोणताच त्रास होऊ द्यायचा नाही. फक्त आपल्या निर्णयामुळे आपल्या माणसांची आयुष्यं बदलू शकतात, याची जाणीव तुला करुन द्यायची आहे.

मला माहीत नाही की मी हे पत्र खरंच तुला पाठवेन की नाही. पण जर पाठवलंच तर या डबडबलेल्या डोळ्यांची साक्ष देऊन सांगते की माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे, जेवढं काल होतं, आणि उद्याही राहील.

तुझ्याच आठवणींत रममाण,

तुझीच आईImage source - Google


पूर्वप्रसिद्धी: Sourabh, annual magazine of MIT


Tuesday, December 06, 2016

घेई छंद - पुस्तक परीक्षण


आपल्या आयुष्यात बऱ्याच phases येत असतात. कधी कधी आवडीच्या गोष्टीसाठी वेळ न मिळाल्याने त्या बाजूला पडत जातात. मग अचानक एखाद्या दिवशी आपल्याला अशा काही गोष्टींची आठवण येते.

मी लहान असताना बरीच पुस्तकं वाचायचो. हळूहळू जसा मोठा होत गेलो तसा पुस्तकांसाठी वेळ कमी मिळायला लागला आणि त्याचा परिणाम म्हणून पुस्तकांचं वाचन थोडं मंदावलं. तरीही मी जसा वेळ मिळेल तसा काढून पुस्तकांचं वाचन चालूच ठेवलं होतं. बरीच पुस्तकं वाचली तरी वाचलेल्या पुस्तकावर आजवर मी कधी काही लिहिलं नव्हतं. अपवाद फक्त सातवीत असताना लिहिलेल्या काही टिपणांचा. त्यामुळे पुस्तक परीक्षण करण्याचा मला अजून तरी काही अनुभव नाही.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेता 'सुबोध भावे' त्याच्या चित्रपटातील अनुभवांबद्दल एक पुस्तक लिहिणार आहे असं कानावर आलं होतं. मी हे पुस्तक, 'घेई छंद', प्रकाशनापूर्वीच विकत घेतलं. एकंदरीत त्याच्या कट्यार (नाटक) ते कट्यार (चित्रपट) या प्रवासाबद्दल हे पुस्तक आहे.

नुकतंच हे पुस्तक संपवून बाजूला ठेवलं आहे, आणि यावर एखादं परीक्षण लिहिण्याचा विचार करतो आहे. ह्या पुस्तकात एकंदरीत ५ प्रकरणे आहेत. पहिलं प्रकरण त्याच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल आहे. यात त्याचा 'पुरुषोत्तम' मधला सहभाग, कॉलेज जीवनानंतर जोडलेले मित्र व केलेली सुरुवातीची कामं अशा गोष्टींचा समावेश आहे. कॉलेजनंतर केलेली नोकरी, तीच नोकरी सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात घेतलेली उडी, 'लेकुरे उदंड जाहली' सारख्या नाटकात अभिनयात अपयश आल्याने झालेली तगमग, संगीताकडे असलेली ओढ, आणि ह्याच संगीत-प्रेमातून जन्मलेला 'मैतर' नावाचा कार्यक्रम सुबोधने आपल्या लेखणीतून फार सुरेखरित्या उतरवला आहे.

दुसरं प्रकरण सुरु होतं तेच मुळी संगीताने भारलेल्या क्षणापासून. राहुल देशपांडे याने केलेली 'संगीत कट्यार काळजात घुसली' ह्या अजरामर नाटकाचं दिग्दर्शन करण्याची विनंती सुबोधला ह्या नाटकापर्यंत आणते. त्यानंतर कास्टिंग, नाटकाचं आकलन, नाट्यपदांचा सराव, राहुल देशपांडे, महेश काळे इ. गायकांना अभिनय शिकवणं वगैरे गोष्टी सुबोधने कशा जमवल्या हे त्याच्याच शब्दांत वाचणे उत्तम. हे प्रकरण वाचताना आपल्याला नाटक बसवणे किंवा नाटकातला अभिनय वगैरे गोष्टी बारकाईने कळतात. एखाद्या नाटकाबद्दल त्या नाटकाचा दिग्दर्शक काय विचार करत असेल, किंवा ते अडीच-तीन तासांचं नाटक बसवायला किती मेहनत घ्यावी लागली असेल हे सुद्धा जाणवतं.

पुढचं प्रकरण 'बालगंधर्व' ह्या चित्रपटावर बेतलेलं आहे. सुबोधला योगायोगानेच 'गंधर्वगाथा' हे पुस्तक मिळतं. बालगंधर्वांच्या जीवनाबद्दल आणि एकुणातच कार्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही हे लक्षात आल्यावर त्याला अपराधी वाटू लागतं. या अपराधीपणाच्या भावनेतूनच तो बालगंधर्वांविषयी जे काही साहित्य उपलब्ध आहे ते वाचून काढतो. ह्या भारावलेपणातूनच या विषयावर चित्रपट काढण्याचं नक्की करतो. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, गायक वगैरे मंडळी जमवल्यावर स्वतःच्या भूमिकेच्या तयारीला लागतो. बालगंधर्वांच्या भूमिकेसाठी त्याने केलेली तयारी आणि घेतलेले कष्ट आपल्याला थक्क करुन सोडतात. तब्बल २० किलो घटवलेलं वजन, 'स्त्री'भूमिकेत परफेक्ट दिसण्यासाठी बदललेली जॉ-लाईन, स्त्रियांची देहबोली जमवण्यासाठी केलेले कष्ट, चार-पाच तासांचा मेकअप, शास्त्रीय गायकाचे हावभाव इ. गोष्टी त्याने फार चांगल्या प्रकारे व डिटेलमध्ये लिहिल्या आहेत. शेवटी बालगंधर्वांच्या भूमिकेतून बाहेर पडताना, 'हा चित्रपट माझ्या करिअरचा महत्वाचा टप्पा असेल, पण हे माझं आयुष्य नाही' असं ठणकावून सांगणारा सुबोधही आपल्या मनाला भावतो.

चौथ्या प्रकरणात 'लोकमान्य... एक युगपुरुष' ह्या चित्रपटाबद्दल लिहिलं आहे. 'बालगंधर्व'सारखा चित्रपट केल्यावर लोकमान्य टिळकांवरसुद्धा एक चित्रपट काढावा असं सुबोधच्या मनात येतं. त्याच वेळी त्याला 'ओम राऊत' सारखा टिळकांवर मनस्वी प्रेम करणारा दिग्दर्शक भेटतो. चित्रपटाच्या निमित्ताने लोकमान्यांच्या आयुष्यातले महत्वाचे पैलू सुबोधला भारावून टाकतात. ह्या प्रकरणात सुबोधने काही महत्वाच्या सीन्स बद्दल खूप छान पद्धतीने लिहिलं आहे.

पाचवं प्रकरण 'कट्यार' सिनेमावर आधारित आहे. 'कट्यार काळजात घुसली' हे नाटक केल्यापासूनच ह्या विषयावर सिनेमा करावा असा विचार सुबोधच्या मनात घोळत होता हे त्याच्या आधीच्या लेखनावरून वारंवार दिसतं. ह्या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी करावी लागलेली धडपड त्याने फार सुरेख पद्धतीने मांडली आहे. पंडितजी आणि खॉंसाहेब या २ भूमिकांचे नायक त्याने बरीच शोधाशोध करून मिळवले. संगीत हा 'कट्यार'चा आत्मा आहे. 'कट्यार' नाटकातली गाणी, नवीन गाणी, त्यांचं संगीत आणि त्याचं गायन हा एक मोठा प्रवास त्याने यात उलगडून दाखवला आहे. प्रत्यक्ष शूटिंग दरम्यानचे अनुभव सुबोधने काहीसे डायरी-फॉर्म मध्ये लिहिले आहेत. त्यामुळे आपण एक real time experience घेत आहोत असा भास आपल्याला होतो.

या पुस्तकाच्या अनेक जमेच्या बाजू आहेत. पहिली बाब म्हणजे सुबोधने पुस्तकात कुठेही स्वतःच्या मोठेपणाचं प्रदर्शन केलेलं नाही. अगदी प्रस्तावनेतसुद्धा त्याने, 'पुस्तक आवडलं तर श्रेय माझ्या मित्रांचं आणि नाही आवडलं तर त्याचं श्रेय फक्त माझं' अशी नम्र जबाबदारी घेतलेली आहे. पुस्तकात मुख्यतः वर्णित कलाकृती ह्या मराठी चित्रसृष्टीत एक मैलाचा दगड ठरलेल्या कलाकृती आहेत. पण तरीही त्याने हे माझ्या अभिनयामुळे साकार झालं अशी दवंडी कुठेही पिटलेली नाही.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्याने सर्व सहकलाकारांचं योग्य त्या ठिकाणी व योग्य गोष्टीसाठी भरभरून कौतुक केलं आहे. सचिन पिळगांवकर, शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे, ओम राऊत, रवी जाधव ('बालगंधर्व'चे दिग्दर्शक), विक्रम गायकवाड (रंगभूषाकार), कौशल इनामदार ('बालगंधर्व'चे संगीतकार), आनंद भाटे ('बालगंधर्व'साठी राष्ट्रीय पारितोषिक विजेते गायक), शौनक अभिषेकी (पं. जितेंद्र अभिषेकी यांचा मुलगा, सुबोधचा मित्र), सुधीर पलसाने ('कट्यार'चा सिनेमॅटोग्राफर), शैलेश परुळेकर (फिटनेस ट्रेनर) इत्यादी सहकाऱ्यांचं त्याने ठिकठिकाणी तोंडभरून कौतुक केलेलं आहे. प्रत्येक प्रकरणात असलेल्या असंख्य छायाचित्रांनी हे पुस्तक रंगीत बनलेलं आहे.

ह्या पुस्तकाच्या काही त्रुटीही आहेत. अनेकदा खूपच informal लिहिण्याच्या नादात व्याकरणाकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. वाक्यांची बांधणी, शब्दांची रचना, र्‍हस्व-दीर्घच्या चुका ह्यामुळे काहीसा अस्ताव्यस्तपणा आल्याचं वारंवार जाणवत राहतं. बऱ्याचदा सहकलाकारांच्या नावाचा गोंधळ वाचकाला होतो. उदाहरणार्थ, 'बालगंधर्व'च्या प्रकरणात, 'महेश' म्हणजे महेश काळे कि महेश लिमये असा गोंधळ उडतो. तसंच काहीसं 'अभिराम' ह्या नावाबद्दल होतं. अभिराम म्हणजे लेखक अभिराम भडकमकर हे समजायला काही पानं मागे उलटायला लागतात. 'कट्यार'च्या प्रकरणात देखील, 'सचिन' म्हणजे सचिन खेडेकर कि सचिन पिळगांवकर असा भ्रम क्वचित होऊ शकतो. अजून एक त्रुटी म्हणजे 'लोकमान्य'च्या प्रकरणामध्ये लिहिलेले काही 'कट्यार'चे अनुभव. हे अनुभव कालानुरूप (chronological orderने) न लावता, विभागवार लिहिले असते तर जास्त चांगले वाटले असते असं राहून राहून वाटून जातं.

या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊनही हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावं असंच आहे असं नक्कीच म्हणावसं वाटतं. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या सुबोध भावेच्या शब्दांत त्याचे अनुभव वाचणे हा खरंच अविस्मरणीय अनुभव आहे.


अन्यत्र प्रसिद्धी :
२. मासिक अंतराळ (जानेवारी २०१७)

Wednesday, November 16, 2016

३३ कोटी + १ट्रिंग ट्रिंग!
"हॅलो?"
"विज्या, सचिन ९२ वर खेळतोय. मी सुम्याला सांगितलंय, तू वैभ्या आणि मोहन ला सांग."
खाड्! दाम्याने फोन आपटला. काही क्षणात ४ही घरांत टीव्ही लागला होता.

-

"सचिन ९२ वर खेळतोय रे...!!"
पणशीकर चाळीत आरोळी घुमली.
चाळीतल्या एकमेव टीव्हीच्या मालकांना दार उघडण्याचीही तसदी घ्यावी लागली नाही. १७ माकडं काही कळायच्या आत खिडकीतून उड्या मारून टीव्हीसमोरच्या चटईवर मांडी घालून बसली होती. टीव्हीवाल्या तावरे काकांनी प्रत्येकाला एकेक चिक्की दिली, आणि स्वतः कोपऱ्यातल्या खुर्चीत जाऊन बसले.
खोलीतल्या १८ जीवांना आता एकाच गोष्टीची आस लागली होती.

-

शोरूम समोरची गर्दी वाढतच चालली होती.
तेवढ्यात एक माणूस तिकडे आला. त्याने आवाज दिला, "स्कोअर काय झाला रे?"
"सचिन ९२ वर पोहोचला" गर्दीतून ४-५ आवाज आले.
त्या माणसाचे पाय थबकले. भारताचा स्कोअर विचारण्याचं भान ना त्या माणसाला होतं, ना ते उत्तर देणाऱ्या गर्दीला.
सगळ्यांचं लक्ष आता एकाच गोष्टीकडे लागलं होतं.

-

"अहो ट्रेन का थांबलीये?"
"स्टेशन आलं काकू..."
"अहो पण इतका वेळ? छोटंच स्टेशन आहे ना?"
"हो, पण सचिन ९२ वर खेळतोय ना..."
"अग्गोबाई! हो का? तरीच आमचे 'हे' गेले उतरून पटकन!"
"चला काकू तुम्हीपण मॅच बघायला!"

-

"फोर फोर फोर फोर फोर.... स्स्सस्स्स. गेली असती."
"दाम्या, उगाच आरडा-ओरडा करू नकोस. २ रन काढलेत ना त्याने?" दादा गुरकावला.
"४ काढले असते! आणि तू रे दादा, तुला सांगितलं ना सोफ्यावर डावा पाय वर घेऊन बसू नको म्हणून. सचिन लवकर आऊट होतो अशाने. खाली घे आधी तो."
"गप रे! असं काही नसतं."
"दादा, मारीन हं! ९४ वर खेळतोय म्हणून सांगतोय. नाहीतर असं कधी सांगतो का मी तुला?"
"तू ढीग सांगशील.. मी ऐकणारे का तुझं? आत्ता शेवटचं हां. ते पण ९४ वर आहे म्हणून."

-

"येsss दोन रन. दोन रन. दोन रन."
पोरांना फार वेळ चटईवर बसवेना. उत्साहाच्या भरात सगळी पोरं उठून उभी राहीली. तावरेकाकांनी गडबडीने सगळ्यांना खाली बसवलं. सगळी परत मॅच बघू लागली.
तेवढ्यात सचिन ने १ रन काढली.
"९५..." पोरं ओरडली.
आता उरल्यासुरल्या चाळीलाही सचिनची सेंच्युरी व्हायला आलीये हे कळलं होतं. तावरेकाकांच्या खिडकीबाहेर सगळे जमले. नुकतेच कामावरून परतलेले घरातले कर्ते पुरुष हात-पाय न धुता तसेच धावले. बायकांनीही 'बघू तरी काय चाललंय' अशा विचाराने गर्दी करायला सुरुवात केली.

-

रस्त्यावरच्या लोकांनी थांबून मॅच बघायला सुरुवात केली होती. टी.व्ही. शोरुमसमोरचा रस्ता माणसांनी व वाहनांनी गच्च भरला होता. एकेका रन साठी जोरदार जल्लोष होत होता.
घरी टी.व्ही. नसलेले, ऑफिसमधून घरी जाणारे, घरी सोय असूनही वातावरण अनुभवायला बाहेर आलेले असे असंख्य लोकं तिकडे जमले होते. एरवी एकमेकांना कधी पाहीलंही नसतं असे लोक शेजारी उभे राहून टाचा उंचावत मॅच बघत होते.
"फोर!!" एकच जल्लोष झाला. सचिन ९९ वर पोहोचला होता. कोणत्याही परिस्थितीत त्या रस्त्यावरून कोणीही हलायला तयार नव्हता.

-

रेल्वे स्टेशनची परिस्थिती याहून काहीच वेगळी नव्हती. स्टेशनवरच्या एकमेव टि.व्ही.समोर दोन-अडिचशे माणसांनी गर्दी केली होती. त्यांच्यातल्या किती लोकांना स्कोअर दिसत होता देवच जाणे, पण कित्त्येकांना स्कोअर बघायचीही गरज नव्हती. 'मघाशी ९२ वर होता, मग दोन रन काढले, म्हणजे ९४, त्यानंतर एक सिंगल आणि एक फोर. म्हणजे ९९.' हा हिशेब कधीचा त्यांच्या डोक्यात चालू होता.
त्या इवल्याशा स्टेशनला स्टेडियमचं स्वरूप आलं होतं.

-

आणि स्टेडियम?
विचारायलाच नको! प्रत्येकाच्या हृदयाची धडधड शिगेला पोहोचली होती. प्रत्येक जण डोळ्यात प्राण आणून एकाच व्यक्तीकडे लक्ष लावून बसला होता. प्रत्येक जण स्वत:ला त्यात बघत होता. आपल्या अपमानाचा, आपल्या दु:खाचा, आपल्या पराभवाचा बदला घ्यायलाच जणू देवाने त्याला पाठवले होते.

आता फक्त १ रन!
सचिन स्ट्राईकवर आला.
"हाऊज् दॅट!!!!" LBWचे जोरदार अपील झाले. करोडो लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. स्टेडियममध्ये एकाएकी मरणशांतता पसरली.
अंपायरनेही अंत पाहीला. शेवटी नॉट-आऊट दिले गेले. आख्ख्या स्टेडियमने रोखून धरलेला श्वास सोडला.


पुढचा बॉल! बॉलर बॉल टाकायला धावू लागला. सर्वांनी मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला. सर्वांच्या नजरा एकाच ठिकाणी खिळल्या. अवघे स्टेडियम स्तब्ध झाले.

"Four runs!! Beautiful shot to reach the milestone. Sachin Tendulkar completes his century with a spectacular boundary." कॉमेंट्रेटर चित्कारला. आख्ख्या देशात आनंदाला उधाण आले.

दाम्याने सगळ्या मित्रांना फोन करुन आनंद शेअर केला. दादाच्या तर तो गळ्यातच पडला.
पणशीकर चाळीत कुणीतरी साखर आणली. सगळ्या पोरांनी चाळकऱ्यांना साखर वाटली. त्या साखरेत जग जिंकल्याचा गोडवा होता.
शोरूमच्या बाहेर जल्लोषाला उधाण आले. कुणी एकमेकांना मिठ्या मारल्या तर कुणी एकमेकांसोबत नाचू लागले.
रेल्वे स्टेशनवरच्या प्रवाशांनाही इतका वेळ थांबल्याचं सार्थक झालं. जणू काळ थांबवू शकणाऱ्या ह्या जादूगाराचं त्यांना विलक्षण कौतुक वाटत होतं.

अवघा देश आनंदात न्हाऊन निघत होता. या 'सचिन' नावाच्या देवदूताच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडत होता.


Sachin Tendulkar image by Adidas. SRT foreverआज सचिन तेंडुलकरला रिटायर होऊन ३ वर्ष पूर्ण झाली. कित्येक अशक्यप्राय विक्रम बनवून त्याने क्रिकेटच्या जगात अढळस्थान प्राप्त केले. मैदानावर राज्य गाजवताना त्याने भारतीय समाजमनाला देखिल एक नवी उभारी दिली. करोडो भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं त्याने २४ वर्ष आनंदाने बाळगलं. आधुनिक भारतीय समाजाच्या जडणघडणीत सचिन तेंडूलकरचा मोलाचा वाटा आहे.
म्हणुनच 'सचिन' नावाचं हे स्वप्न गेली २७ वर्ष आपण हृदयात बाळगून आहोत!


अन्यत्र प्रसिद्धी : मासिक अंतराळ (डिसेंबर २०१६)


Contact Form

Name

Email *

Message *