Friday, October 20, 2017

पुस्तकखरेदी


आज खूप दिवसांनी नवीन पुस्तकं घेतली. खरंतर खूप वर्षांनी! गेल्या २-३ वर्षांत दुकानात जाऊन पुस्तकं घेतलीच नव्हती. जी ४-५ घेतली होती ती सगळी ऑनलाईनच घेतली होती. त्यामुळे मी बऱ्याच दिवसांपासून अशा प्रकारच्या खरेदीपासून वंचित होतो.

ऑनलाईन खरेदी सोयीची, स्वस्त वगैरे असते हे अगदी खरंय, पण पुस्तकाच्या दुकानात जाऊन पुस्तकं घेण्यातली मजा त्यात नसते हे दसपटीने खरं आहे. पुस्तकाच्या दुकानाचा माहोलच काही वेगळा असतो. लेखकांच्या नावानुसार किंवा पुस्तकाच्या जॉनरनुसार शेकडो पुस्तकं मांडून ठेवलेली असतात. आपल्याआधी आलेली गिऱ्हाईकमंडळी कुठल्याशा कप्प्यासमोर उभं राहून पुस्तकं न्याहाळत असतात, किंवा कुठल्याशा पुस्तकाचं मलपृष्ठ, प्रस्तावना किंवा आतलं एखादं पान लक्षपूर्वक वाचत असतात. काही हौशी लोक दुकानाच्या मालकालाच दुकानभर फिरवून त्याच्याशी गप्पा मारत असतात. काही लोक तिथलंच एखादं स्टूल पकडून निवांत वाचत बसलेली असतात.

पुस्तकाच्या दुकानात स्थळा-काळाचं भान ठेऊन जायचंच नसतं. समोर दिसेल त्या पुस्तकात बुडून जायची तयारी ठेऊनच यायचं असतं. फिरता फिरता आपल्याला कित्त्येक दिवसांपासून घ्यायची असलेली, कुणीतरी कधीतरी 'नक्की वाच' म्हणून सांगून ठेवलेली, आपणच कधीतरी कुणीतरी सांगितलेलं कवित्व ऐकून 'नक्की वाचायचं' ठरवूनही विसरलेली अशी अनेक पुस्तकं तिथे दिसत असतात. मग आपण हळूहळू एकेक पुस्तक पारखत निरखत निवडायचं असतं. थोडं वाचायचं असतं, मात्र उरलेलं नंतर वाचण्यासाठी विकत घ्यायचं असतं.

मी बऱ्याच दिवसांपासून कोथरूडमध्ये सुरु झालेल्या एका नव्या दुकानाबद्दल ऐकून होतो आणि तिथे जाण्याची इच्छा मनी बाळगून होतो. आयडियल कॉलनीतल्या एका छोट्याशा, शांत लेनमध्ये 'पुस्तक पेठ' हे दुकान आहे. आज सकाळी मी तिकडे गेलो. तिथे गेल्यावर अगदी वरच्यासारखा अनुभव येतो. दुकानाच्या मालकांनी अगदी हसतमुख चेहऱ्याने माझं स्वागत केलं. २-३ वर्षांचं हरवलेलं काहीतरी पुन्हा सापडल्यासारखं वाटलं. मी एकेक पुस्तक बघायला सुरुवात केली. दुकानाचे मालकही मधेच येऊन एखादं पुस्तक सुचवत होते. माझी नजर वेधून घेणारी अनेक पुस्तकं तिथे होती. त्या छोट्याशा दुकानातून मनसोक्त फिरत ३ पुस्तकं मी निवडली. त्या पुस्तकांवर अनपेक्षित discount मिळवून, तरीही बजेट ओव्हरफ्लो झाल्याचं गोड guilt मनात घेऊन आणि पुस्तक पेठेचं स्टार सभासदत्व घेऊनच मी बाहेर आलो.

दिवाळीचं शॉपिंग याहून चांगलं काय असतं?

पुस्तकं वाचून झाल्यावर लिहावंसं वाटलं तर ह्या पुस्तकांबद्दल नक्की लिहीन, पण सध्या थोडासा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाहीए.

पहिलं पुस्तक पु. लं. देशपांडेंचं 'एक शून्य मी' हे आहे. पुलंची अनेक विनोदी पुस्तकं आपल्याला माहिती असतात, आपण त्यांची अक्षरशः पारायणं केलेली असतात. पण पुलंनी केलेलं वैचारिक लेखन आपण फारसं वाचलेलं नसतं. पुलंच्या ह्या पुस्तकात त्यांच्या लेखनाचा नेमका हाच पैलू अधोरेखित झालेला आहे. काही दिवसांपूर्वी हे पुस्तक मला कुणीतरी recommend केलं होतं आणि त्यामुळे माझ्या ते लक्षात होतं. 

दुसरं पुस्तक हे Haruki Murakami ह्या जपानी लेखकाने लिहिलेलं 'Kafka on the shore' हे आहे. ह्या 'fiction' वर्गात मोडणाऱ्या पुस्तकाची काही परीक्षणं मी वाचली होती आणि त्यामुळे हे पुस्तक वाचायची माझी तीव्र इच्छा होती.

मी घेतलेलं तिसरं पुस्तक म्हणजे व. पु. काळेंचं 'वपुर्झा'. मी इतकी वर्ष वपुंच्या अनेक पुस्तकांपैकी एकही पुस्तक वाचलं नव्हतं. काही दिवसांपूर्वी त्यांचं 'पार्टनर' हे पुस्तक वाचल्यावर मला त्यांच्या लेखनातल्या जादूची अनुभूती झाली. 'पार्टनर' खूप आवडल्याने आणि 'वपुर्झा'बद्दल बरंच ऐकून असल्याने मी तेही पुस्तक लगेच घेऊन टाकलं.

वाचायची इच्छा असलेल्या पुस्तकांची मी एक यादी बनवलेली आहे. कुठल्या नव्या पुस्तकाबद्दल वाचलं किंवा कुणी एखादं पुस्तक वाचायला सुचवलं की मी त्या पुस्तकाचं नाव त्या यादीत टाकत असतो. आज दुकानात जाताना ती यादी एकदा वाचून ठेवली होती. शक्यतो फार शोधाशोध करावी लागू नये असा उद्देश होता. पण दुकानात गेल्यावर त्या यादीचा मला जणू विसरच पडला. तिथे असलेली असंख्य पुस्तकं मला भुरळ पाडत गेली आणि तीनपैकी फक्त एकच  पुस्तक मी त्या यादीतलं घेतलं.बऱ्याच दिवसांनी (दुकानात जाऊन) घेतलेल्या पुस्तकांमुळे झालेला आनंद आणि नव्या पुस्तकांबद्दल असलेली उत्सुकता मला स्वस्थ बसून देत नाहीए. शेजारीच असलेली तीनही पुस्तकं मला हाका मारताहेत. याहून जास्त वेळ हा ब्लॉग लिहीत बसणं मला जमणार नाहीए. लेखन थांबवून वाचन कधी सुरु करतोय असं मला झालंय. सध्यापुरता बाय बाय!


7 comments:

 1. माझा ब्लॉग वाचून अनेक जण ब्लॉगवर कमेंट करत असतात. तुमच्या ह्या कमेंट्सना मी replyसुद्धा देत असतो. पण तो reply आला आहे असं notification पाठवण्याची सोय Blogger ने केलेली नसल्याने अनेकांना reply आल्याचं कळतच नाही. यासाठी एक उपाय आहे. कमेंट करताना कमेंटबॉक्सच्या खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात 'Notify me' असा एक चेकबॉक्स आहे. त्या चेकबॉक्समध्ये टिक करूनच आपली कमेंट पोस्ट करा, म्हणजे पुढच्या कमेंट्स मेलद्वारे कळतील.

  ReplyDelete
 2. Murakami बद्दल बरंच ऐकून आहे. पुस्तकं वाचायचीही खूप इच्छा आहे. विकत घेण्यापूर्वी तुझं परिक्षण वाचायला आवडेल. बाकी तू दिवाळीच्या खरेदीत पुस्तकंही समाविष्ट केलीस हे पाहून बरं वाटलं आणि कवितासंग्रह पुढे मागे घेणारं असशील तर नामदेव ढसाळ यांचे कवितासंग्रह नक्की वाच.

  ReplyDelete
  Replies
  1. मीही बरंच ऐकलंय आणि आता पुस्तक वाचायला उत्सुक आहे. वाचून झाल्यावर माझं पुस्तकाबद्दलचं मत तुला नक्की सांगेन.

   कवितासंग्रहांच्या बाबतीत माझ्यासाठी ग्रेसांचा 'चंद्रमाधवीचे प्रदेश' हा कवितासंग्रह सर्वात preferred आहे; पण तू म्हणतोस तर ढसाळांचे काव्यसंग्रह मी नक्की वाचेन. एखादा specific suggest करू शकशील?

   Delete
 3. पुस्तकांची यादी कळू शकेल का?

  ReplyDelete
  Replies
  1. फेसबूकवर मेसेज करतो.

   Delete
 4. पुस्तक खरेदीचा आनंद पुस्तकांच्या दुकानात जावून घेणं ही वेगळीच मजा. It's always pleasure to get sorrounded by books. वरच्या तीन पैकी एक शून्य मी आणि वपुर्झा ही वाचलेली आहेत. एक शून्य मी तर परत परत वाचावे असे आहे. पुलंबद्दलची वेगळी प्रतिमा मनात उमटवणारे आहे. तिसऱ्या पुस्तकाबद्दल आधी तुझ्याकडून ऐकायला आवडेल. मग नक्की वाचेन. Enjoy reading and don't forget to pen down your thoughts.

  ReplyDelete
  Replies
  1. कुणीतरी पुस्तक सुचवावं, आपण ते वाचून काढावं आणि आपल्याला ते आवडावं हा अनुभव मी घेतला असल्याने आणि त्यातली मजा मला माहित असल्याने मला आवडलेल्या पुस्तकाबद्दल सांगायला मला नक्की आवडेल.

   Delete

Contact Form

Name

Email *

Message *