Wednesday, October 26, 2016

दिवाळी Fever

दिवाळीच्या आधीचे ३-४ दिवस मला फार आवडतात. फराळाची वगैरे तयारी चालू असते, लोकांनी आकाशकंदील लावायला सुरुवात केलेली असते, पणत्या शोधून ठेवलेल्या असतात, एकंदरीत कसं, सगळे या आनंद-सोहळ्याची अगदी आतुरतेने वाट पहात असतात.


याच दरम्यान नवीन काहीतरी खरेदी करण्याची लगबग सुरु झालेली असते. विविध दुकानांचे 'सर्वात मोठे' वगैरे सेल सुरु झालेले असतात. 'दिवाळीचं काय घेतलं?' अशी विचारणा होऊ लागलेली असते. 'दिवाळी पहाट'च्या कार्यक्रमांचा शोध देखील सुरु झालेला असतो. एरवी १०-१० पर्यंत लोळत पडणारे वीरही 'दिवाळी पहाट' साठी लवकर उठायला तयार झालेले असतात. घरोघरी दिवाळी अंकांची आठवण होऊ लागते. मग हा चांगला कि तो, असा किस पाडत २-४ दिवाळी अंक आणले जातात. रोजचा पेपर सुद्धा घाईघाईत उरकणारे आपण, चवीचवीने दिवाळी अंकाची पाने वाचू लागतो.

आधीचे ३-४ दिवस अशी तयारी, स्वप्नरंजन वगैरे करण्यात गेल्यावर actual दिवाळी येते. दिवाळीत तश्या धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजा सोडता, धार्मिक गोष्टी फार कमी असतात. त्यामुळे छान छान कपडे घालून, चकली-चिवड्याचे बकाणे भरत फिरणे याशिवाय फारसं काही काम नसतंच. (ह्यामुळेच कदाचित दिवाळी इतकी लोकप्रिय असावी!) मग जाताजाता उगाच पणतीची वात सरळ करणे, आकाशकंदिलाचं orientation बदलणे, दिवाळी अंकातला दोनदा वाचून झालेला लेख तिसऱ्यांदा चाळणे इत्यादी कामे सुचू लागतात.

धनत्रयोदशीला असलेलं 'आत्ता कुठे सुरु झाली दिवाळी' हे feeling भाऊबीजेपर्यंत 'काय हे! संपली पण दिवाळी' मध्ये परावर्तित झालेलं असतं. परराज्यातले लोक घरी गेल्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांवर अनुभवास आलेली 'दुर्मिळ मराठी शांतता' हळूहळू संपू लागलेली असते. फराळाचे डबे रिकामे होऊ लागलेले असतात. काही दिवसात आकाशकंदील परत खाली उतरवला जातो, पणत्या कपाटात जातात, आणि माणसं आपापल्या कामात मग्न होतात. मग मधेच कुणाला तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी फटाक्यांमुळे आलेली गोड जाग, किंवा भाऊबीजेचं ओवाळताना बहिणीने मारलेले टोमणे अशा गोष्टी आठवतात, आणि आपण पुढच्या दिवाळीची परत एकदा आतुरतेने वाट बघायला सुरुवात करतो.

असो! अजून दिवाळी सुरु व्हायचीये. त्यामुळे सध्या 'धनत्रयोदशी मूड' मध्ये जायला हरकत नाही. घरादाराची साफसफाई, पणत्यांची शोधाशोध सुरु करायलाही हरकत नाही. दिवाळीची खरेदी मित्रांना दाखवायला आणि त्यांचा आनंद वाटून घ्यायलाही हरकत नाही.

सर्वांना ह्या दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा!

Image source : Google

13 comments:

Contact Form

Name

Email *

Message *