Saturday, June 25, 2016

ब्रेक्झिट-पुराण


ब्रेक्झिट झालं! कोण तो ब्रिटन देश कुठल्याश्या यूरोपियन युनियन मधून बाहेर पडला. आमचा काय संबंध? काsssही नाही! पण आम्हाला चघळायला विषय तर मिळाला ना...

"कित्ती बावळट आहेत हे ब्रिटनचे लोकं", "स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला.", "राहिले असते सुखाने तर काय बिघडलं असतं?" इथपासून ते "ब्रेक्झिट म्हणजे काय असतं रे?" किंवा "आपला काय संबंध त्याच्याशी?" पर्यंत प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. हल्ली ह्या असल्या प्रतिक्रिया देणं किंवा एखाद्या विषयावर घनघोर चर्चा करणं किंवा आपलं असलं-नसलं सगळं ज्ञान पाझळणं हे फार सोप्पं होऊन गेलं आहे. एखाद्या विषयावर सर्च करायचं, एखादी बऱ्यापैकी दिसणारी (म्हणजे interface वगैरे बरंका) website पकडायची आणि द्यायची लिंक पाठवून गावभर! ह्यातून होतं काय? तर आपल्याबद्दल असा सुगैरसमज (हा माझाच शब्द बरंका! चांगला पण चुकीचा समज याअर्थी. कसा वाटतोय?) पसरतो की ह्याला कळतंय बुवा खूप काही! खरंतर आपण किंवा सुगैरसमज करून घेणाऱ्यानी ती website वरची गोष्ट पूर्ण वाचलेलीच नसते (किंवा वाचली तरी कळते किती जणांना काय माहीत!). पण असं कसं सांगायचं? आपल्याबद्दल कुगैरसमज पसरणार नाहीत का? असं कसं होऊन चालेल? नाही नाही! त्यापेक्षा काहीतरी मोघम बोलायचं. चर्चा वाढवत ठेवायची.

तर मुद्दा होता 'ब्रेक्झिट'चा! तिकडे ते ब्रिटनवाले बाहेर पडले, त्यांच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि इकडे आमची चर्चा सुरू झाली. ह्या असल्या चर्चा त्या NEWS चॅनेलवाल्यांपेक्षा जास्त रंगतात, वाढतात, फोफावतात आणि भरकटतात असा अनुभव आहे. त्या चॅनलवाल्यांकडे 'ब्रेक के बाद'चं अस्त्र तरी असतं. एक तासाची वेळ तरी असते. इथे कसलं काय? सगळेच तापलेले! तावातावाने बोलायचं, कशाची तरी बाजू घ्यायची आणि मुद्दे मांडायचे! तर अशी ही चर्चा सुरू झाली. कुणीतरी म्हणलं की मूर्खपणा केला या ब्रिटनवाल्यांनी, कुणीतरी म्हणलं बरोबरच आहे त्यांचं. कुणी पहिल्याची री ओढतंय, कुणी दुसऱ्याला पाठिंबा देतंय. कुणी लिंक्स पाठवतंय तर कुणी व्हिडिओ. हे असलं सगळं तप्त वातावरण चालू असतानाच एक कोणीतरी आला आणि म्हणू लागला की काय त्या 'ब्रेक्झिट' वर चर्चा करता, भारतातल्या खेडोपाडी काय कमी प्रश्न आहेत का? झालं! सगळे त्याच्यावर तुटून पडले. 'ब्रेक्झिट'वर चर्चा करणं म्हणजे भारतातल्या प्रश्नांबद्दल असंवेदनशील असणं असं नाही, वगैरे त्याला सांगू लागले. इतका वेळ ब्रिटन चा कौल बरोबर की चूक यावर तावातावाने भांडणारे आता एक होऊन 'ब्रेक्झिट'वर चर्चा करावी का नाही यावर भांडू लागले. यातच कुणीतरी चर्चा करण्यापेक्षा कृतीवर भर दिला पाहिजे वगैरे ज्ञानामृत पाजायला सुरू केलं आणि भांडाभांडीचा नुसता कल्लोळ उडाला.

कालांतराने मूळ मुद्दा बाजूलाच राहून, 'ब्रेक्झिट'वर चर्चा करणं हे कितपत योग्य आहे यावरच जास्त चर्चा होऊ लागली. 'ब्रेक्झिट'वर चर्चा करणं हे कसं जास्त 'ग्लॅमरस' वगैरे आहे, आणि भारतातल्या प्रश्नांवर चर्चा करणं हे कसं लोकांना 'अनइंटरेस्टिंग' वाटतं असले मुद्दे येऊ लागले. अश्या वेळेला माझी अवस्था मोठी विचित्र होते. कधी ह्याचं तर कधी त्याचं असं मला दोन्ही बाजूचं पटू लागतं. मग मत मांडणं सोडाच, पण मत बनवणं पण कठीण होऊन बसतं. तर ही चर्चा सगळे दमल्यावर थांबली. कुण्या शहाण्यांनी कुंपणावर बसून सल्ले देत सारवासारव केली आणि सगळं एकदम कसं छान-छान वाटू लागलं.

चर्चा थांबली, तरी मनातलं द्वंद्व थांबेना. 'ब्रेक्झिट'मागचं Economics आणि Politics समजून घ्यायची इच्छा माझीही होती, पण त्यापेक्षा आपण भारतातले प्रश्न समजून घेण्यासाठी इतका आटापिटा कधी केला होता का, असा प्रश्न मनात येऊ लागला. या चर्चेत काही लोकांनी अप्रत्यक्षपणे 'भारताचेच प्रश्न का महत्वाचे? आपण सगळ्याचा विचार केला पाहिजे' असा काहीसा उदारमतवादी सूर लावला होता. ते मात्र मला नक्कीच पटलं नव्हतं. अर्थात 'ब्रेक्झिट ला काय मोठं सोनं लागलंय, त्यापेक्षा भारतात बघा किती विषमता आहे' ह्या विधानाला सुद्धा मी नाक मुरडलं होतं. कुठलातरी मध्यममार्ग मला खुणावत होता, पण सापडत मात्र आजिबात नव्हता. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मी माझा विचार करायला सुरुवात केली. भारतातले प्रश्न महत्वाचे नक्कीच आहेत पण म्हणून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करूच नये असं काही नाही, असं साधारण मत बनलं. पण यावर दोन प्रश्न माझ्या मनात आले की, 'भारत इतका महत्वाचा का?' आणि 'आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास का करायचा?' यापैकी दुसरा प्रश्न सोपा होता. त्याच्या उत्तराची मला सवय होती. मला खुणावत होता तो पहिला प्रश्न! 'भारत इतका महत्वाचा का?'

मध्यंतरी कुठल्याशा websiteवर एक प्रश्न वाचला होता. 'जर आपण कोठे जन्म घेतो हे आपल्या हातात नसेल, तर आपण आपल्या देशाचा अभिमान का बाळगावा?' तेंव्हासुद्धा मनात विचार सूरु झाला होता. भौगोलिक प्रदेशावर असणाऱ्या प्रेमाला (किंवा आदराला) हा सवाल होता. 'भारत माझा देश आहे' या वाक्याच्या अर्थाचा मनोमन विचार करायला लावणारा हा प्रश्न होता. देश माझा आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे असं वाटत नाही का? हे असले प्रश्न त्या मूळ प्रश्नाच्या अनुषंगाने मनात पिंगा घालू लागले.

भारतीय असल्याचा नक्की अभिमान तरी का? तर हा अभिमान आहे आमच्या संस्कृतीचा, आमच्या इतिहासाचा आणि आमच्या परंपरांचा. अभिमान वाटतो तो इथल्या विचारधारेचा, इथल्या माणसांचा आणि या माणसांमध्ये असलेल्या माणुसकीचा. भले यात माझं काहीही कर्तृत्व नसेल, पण तरीही मला याचा एक भाग असल्याचा अभिमान आहे. आपण इथे शहरांत बसून हे असले विचार करत असतो. कुठल्यातरी abstract गोष्टींवर विचार/चर्चा करत बसतो. देशाचा अभिमान बाळगावा की नाही याचा किस पाडत बसतो, पण त्या देशासाठी, किंवा कुणासाठीच करत मात्र काहीच नाही. हे सगळं असं असेल तर उपयोग काय अभिमान वाटून किंवा न वाटून? एखाद्या दुष्काळपीडित किंवा अंधश्रद्धाग्रस्त गावात काम करणारा एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल, किंवा सीमेवर आपल्या सुरक्षिततेसाठी लढणारा जवान असेल, त्यांच्या मनात असले विचार का येत नाहीत? 'ब्रेक्झिट'वर चर्चा करता करता भारतातल्या प्रश्नांकडे पण लक्ष द्यावं असं त्यांना का वाटत नसेल? कारण ते ह्या देशाविषयी त्यांच्या मनात असलेला अभिमान जगत असतात. देशातल्या लोकांविषयी मनात असलेली आस्था कामात उतरवत असतात. त्यांना ह्या असल्या conflicts साठी वेळच नसतो मुळी! त्यांना 'देशाचा अभिमान का बाळगावा?' या प्रश्नापेक्षा 'देशासाठी काय काम करावं?' हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटत असतो.

हे सगळं माझ्या मनात आलं, आणि त्या 'ब्रेक्झिट'चर्चेमधला 'कृतीवर भर द्या' सांगणारा 'तो' आठवला. त्याच्या विचारांमधला खोल भाव हळू हळू लक्षात यायला लागला. अजूनही मला एकाच वेळी दोन्ही बाजू पटत असतात, पण दोन्ही बाजूंपेक्षा त्यातला सुवर्णमध्य मला जास्त जवळचा वाटतो. जेंव्हा चर्चा, मग ती कोणत्याही चकाकत्या किंवा साध्याशाच विषयावरची असो, संपून कृतीची सुरुवात होईल, तेंव्हाच तो सुवर्णमध्य खऱ्या अर्थाने साधला जाईल.

24 comments:

 1. Brexit च्या निकालाने व ट्रम्प च्या अनपेक्षित यशाने सर्वांनाच स्थलांतराचा व पर्यायाने जागतिकिकरणाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. ज्यापासून भारत अलिप्त राहु शकत नाही. त्यामुळेच सदर विषयावर मतप्रदर्शन करणे म्हणजे देशांतर्गत प्रश्नांना वाऱ्यावर सोडले असे होत नाही. 'शेतकर्यांच्या आत्महत्या होत असलेल्या देशाचे अंतराळ संशोधनात काय काम?' इ टिपण्णिंची आठवण झाली.

  ReplyDelete
  Replies
  1. Asha lokanmule kharatar rashtriya vishayanvar charcha karna avaghad ahe. Hya prakarche matapradarshan hech kuthetari abhyas purna National dialogue na honyakarta responsibile ahe.

   Delete
  2. हाहा! केदारदादाची कमेंट आवडली. माझी काहीशी द्विधा मनस्थिती अशा वेळी होते असं मी लेखात म्हटलं होतं. भारतातल्या प्रश्नांचा विचार करायचा की आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करायची या पेचावर ही कमेंट उत्तर असू शकतं का?

   Delete
  3. Why to stop at national level ? we have nothing to do with northeast or another states so don't think about it, just think about Maharashtra then your district then taluka, village and yourself.

   Delete
  4. To Mr. Unknown,
   First of all, welcome to my blog. I hope you will read other blog-posts and give your valuable comments.
   Anyway! Let me talk about this one!
   We have terminologies like, 'वसुधैव कुटुम्बकम्', 'हे विश्वची माझे घर' etc. But on the other hand, we think about our nation first. We feel about our nation more than other countries. We follow local news, we interest fancying up national politics and we discuss socio-economic consequences of anything that happens internationally on our nation. Why? Because we are more concerned about our nation than other countries.
   Does it sounds contradicting? Yes! It sounds contradicting because we fail to fix the priorities. According to me, it is more important to work on national issues first, to be eligible to have our command on international ones. If we ourselves are strong enough to hold our voice high (which is reflected through our development as a nation, be it in any form), we are more conceivable internationally. We are well aware of examples.
   By this, I certainly don't mean to stop thinking broader. I appreciate broader works and broader thoughts, but not in the cost of our own issues.

   Anyway! Keep visiting the blog. I'll be happy to see you again and again.

   Delete
 2. Replies
  1. धन्यवाद मयुर! ब्लॉगला अशीच भेट देत रहा...

   Delete
 3. खुप मस्त लिहिलय रजत...

  ReplyDelete
 4. Kruti karna mhanaje nakki kay??
  Ani ekhadya vishaya sambandha madhil mahiti ghene ani tyavar charcha karna hi suddha ek kruti nahi ka?
  Dyansankalan karne mhanaje kruti karane ase nahi ka?
  Miro level work can be done without hving a knowledge abt world issues at some point we also need to work at macro level n to do so we must work on knowledge.
  Ashya charchanmadhunach deshstithicha abhyas ha macro level la hoto.
  Tyamule charche peksha kruti var laksha dya mhanatana, charcha karne pan ek kurti ahe he lakshat thevave.

  ReplyDelete
  Replies
  1. अगदी खरंय! ज्ञानसंकलन करणे, राष्ट्रप्रश्नांवर चर्चा करणे इत्यादी गोष्टींची नक्कीच गरज आहे.
   चर्चा करणे ही सुद्धा एक कृतीच आहे, हे सुद्धा काही मर्यादेपर्यंत योग्य आहे.

   पण या चर्चेनंतर जर कृतीकडे पावलं वळणार नसतील (फार आदर्शवादी अपेक्षा बाळगतोय का मी) तर चर्चेचा उपयोग काय? ज्ञानवृद्धी करायची ती त्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी. जर उपयोग झालाच नाही, तर ज्ञान असून-नसून सारखंच!

   Micro level आणि Macro level economics हे हातात हात घालून जातात हे मात्र नि:संशय सत्य आहे.

   Delete
 5. Rational decision making at micro level shd hv different variables than macro level. For example, person who has hatred towards immigrants will Always hv a stand to ban immigration. But decision making at macro level will require a rational study on how exactly is immigration working?.. is it actually affecting the labour market equilibrium? Etc. Though at individual level optimization can happen by following theory of absolute advantage but at macro level nash equilibrium gives the best optimized output.

  ReplyDelete
 6. Sometimes u people speak my mind... Jamlay!!!

  ReplyDelete
 7. छान लिहिले आहेस.... but feels like in state of little confused mind.
  १. सुगैरसमज... शब्द छान आहे... समानार्थी शब्द 'गोड गैरसमज'. या परिच्छेदात जे मांडलय याच्याशी पूर्ण सहमत आहे...
  २. परवा मी ही ब्रेक्सिट साठी इथे England मध्ये मतदान केले. इथे या ब्लॉग वर त्याचे भारतावर किंवा इतरत्र होणारे परिणाम वैगेरेवर मत मांडणे अपेक्षित नाहीच... पण कसं आहे ना जगात कुठेतरी काहीतरी होणं... आणि त्यावर आपलं विचारचक्र सुरू होणं हे संवेदनशील असल्याचं प्रतिक आहे. चूक-बरोबर हे व्यक्तिसापेक्ष बदलेल, पण चर्चा होणारच. आपला काय संबंध, आपल्याला काय फरक पडतो असं म्हणणं अगदी एकांगी आहे असं मला तरी वाटतं. मी clg मध्ये असताना debate ला एक विषय होता, 'दोन वेळचे पुरेसे अन्न ज्या देशातल्या काही लोकांना मिळत नाही त्या देशाने अवकाश संशोधनावर इतका पैसा ओतावा की नाही' असो,
  ३. 'मी भारतीय असल्याचा अभिमान' --- विश्व, खंड, देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, घराणं, आई-वडील आणि मग मी स्वतः या प्रत्येक पातळीवर बदलत जाणारी संस्कृती, इतिहास परंपरा या सगळ्या विचारधारांवर आधारलेला अभिमान.....असायचाच

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद! Confused तर मी होतोच! त्या confusionमुळेच तर हे लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

   १. गोड गैरसमज कसं काय सुचलं नाही मला? पण मग 'कुगैरसमज'ला काय लिहलं असतं? 'कडू गैरसमज' वगैरे! असो!

   २. चर्चा होणार, चर्चा करणं ही सुद्धा कृतीच आहे वगैरे पटलं, पण अकारण वाढत जाणारी चर्चा आणि त्यातून निघणारे वेगळेच विषय, ह्याबद्दल नाराजी होती. तो Debateचा विषय छान वाटला. एकदा try करायला हरकत नाही! जाता जाता फारसा विचार न करता यावर मत मांडू? 'प्रत्येकाची भूक वेगवेगळी असते. कुणाची भाकरीची, तर कुणाची संशोधनाची.'

   ३. नक्कीच!

   Delete
 8. खूपच छान! माझ्या मते, आजचा तरुण अशा विषयावर चर्चा करत असेल तर तो सुजाण आहे असंच मी म्हणेन. राष्ट्राभिमानबद्दल मांडलेले मत योग्यच आहे; पण संस्कृतीचा आदर असावा, वाईट रूढी परंपरांचा नको!

  ReplyDelete
 9. Ratnagiri Property is great place for meditation, eco living and cultural place, it's best tourism place must visit yearly.. i found many informative info from this post and blog

  ReplyDelete
  Replies
  1. I have deleted one such comment from you. But now I am keeping this comment to show others what not to post here.
   Do not post such comments here.

   Genuine opinions on the topic from the blog are welcome.

   Delete

Contact Form

Name

Email *

Message *