Friday, February 05, 2016

ब्लॉगरबाळ्या, सिग्नल आणि आदर्श'वाद'…

तो मुलगा दिसला तुम्हाला? तो. तिकडे. थोडं उजवीकडून पहा बरं. हां. दिसला? बरोब्बर! तोच तोच. नीट बघा. तोच आपला ब्लॉगरबाळ्या.

ब्लॉगरबाळ्या... caricature by 'बाबा' ;) 

ब्लॉगरबाळ्या! एक साधा, सरळ मुलगा. हुशार, तरीही मिश्किल आणि चलाख, तरीही वेंधळा. आता तुम्ही म्हणाल यात काय बघण्यासारखं आहे? तर थांबा. बघण्यासारखं नसलं तरी ऐकण्यासारखं नक्कीच आहे.

हा पोरगा ब्लॉग लिहीतो. मराठी ब्लॉग. काय लिहीतो बरं हा त्याच्या ब्लॉगवर? हा पहा त्याचा ब्लॉग. आपला हा ब्लॉगरबाळ्या आजुबाजुच्या लोकांचं निरीक्षण करतो आणि त्यांना जसंच्या तसं आपल्या ब्लॉगवर उतरवतो. कधी त्या लोकांबद्दल, कधी त्यांच्या बोलण्या-वागण्याबद्दल, कधी त्यांच्या चालीरितींबद्दल तर कधी या लोकांमुळे आलेल्या अनुभवांबद्दल. ब्लॉगरबाळ्याचं लेखन सतत चालु असतं.

अगदी परवाचीच गोष्ट. ब्लॉगरबाळ्या रस्त्याने चालला होता. तेवढ्यात दोन माणसं बोलत बोलत त्याच्या जवळ येऊन थांबली. ब्लॉगरबाळ्याला त्यांचं बोलणं स्पष्टपणे ऐकु येऊ लागलं.

"कसा सिग्नल मोडुन गेला बघ तो...!!"
"जाऊदे रे, घाई असेल."
"घाई कसली आलीये? लवकर निघता येत नाही?"
"नसेल जमलं कदाचित..."
"मग जमवायचं. वेळेत पोहोचायचं असेल तर वेळेत निघायला नको?"
"अरे चूका होतात माणसांकडुन. प्रत्येक वेळी आपण त्यांना धारेवर धरणार का?"
"चूका होतात हे मान्य आहे. पण एका चूकीवर पांघरुण घालायला दूसरी चूक करायची? तेही जाणुनबुजुन?"
"मग काय करणार? उशिरा पोहोचणार? उशिरा गेल्याने होणारं नुकसान दिसत असतं डोळ्यासमोर. मग त्यातुन वाचण्याचा हा सोपा मार्ग. बस् इतकंच."
"हे बघ, सिग्नल मोडणं हा सोपा मार्ग नक्कीच नाही. आपल्याबरोबरच दुसऱ्याच्याही जीवाशी खेळ आहे हा."
"पण तितकी काळजी घेतच होता तो..."
"रस्त्यावर गाडी चालवणारे सगळेच काळजी घेत असतात; तरी अपघात होतातच ना?"
"ते त्यांचं नशिब!"
"वा... कृत्ये आपण करायची आणि परिणाम नशिबावर ढकलायचा?"
"हे बघ, अशा काही गोष्टी असतातच ज्यांच्यावर आपला काहीच कंट्रोल नसतो."
"आणि ज्या आपल्या हातात असतात त्या? त्यांचं काय? की त्या पण नशिबावर ढकलून मोकळं व्हायचं?"
"असं म्हणायचं नाहीए मला. पण काही वेळा परिस्थितीच अशी असते की आपल्यासमोर इलाज नसतो."
"मग परिस्थितीच्या नावाखाली चुका करायच्या आणि काही झालं की डोक्याला हात लावायचा."
"चूक-बरोबर, योग्य-अयोग्य हे सगळं सापेक्ष असतं. हा सिग्नल मोडणं ही त्या माणसासाठी कदाचित योग्य कृती असेल."
"म्हणजे सगळं ह्यांनीच ठरवायचं. सिग्नलची पद्धत ज्यांनी सुरु केली किंवा जे सिग्नल पाळतात ते मूर्खच ना?"
"ते त्यांच्या दृष्टीने योग्य होतं. हे याच्या दृष्टीने आहे."
"म्हणजे प्रत्येकाने फक्त स्वत:च्या स्वार्थापुरता विचार करायचा? अनागोंदी माजेल अशाने."
"स्वार्थापुरता नाही रे... सोयीचा."
"आणि आपली सोय पाहताना दूसऱ्याची गैरसोय होत नाही ना हे पाहणंही आपलंच कर्तव्य आहे ना?"
"प्रत्येक वेळी असा विचार करणं शक्य आहे का रे? "
"शक्य आहे की नाही माहीत नाही. पण गरजेचं आहे एवढं नक्की."
"आदर्शवादी झालं हे सगळं..."
"आदर्शाकडे वाटचाल म्हणजेच तर जीवन. नाही का?"
"पण आदर्शवादाची अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षाभंगाचीच तयारी ठेवणं नाही का? परफेक्ट कोणीच नसतो. आपण आहोत? नाही ना... मग समोरच्याकडुन कशी काय अपेक्षा?"

वादाला शेवट नसतो. वादाचं संवादात रुपांतर हाच वादाचा निकाल. कुणाला पहिला बरोबर वाटेल तर कुणाला दूसरा. ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर अवलंबुन राहून शेवट त्यालाच ठरवु देणं हेच काय ते आपल्या हातात.


इति ब्लॉगरबाळ्या

16 comments:

  1. Kharokhar, sagdyancha aap aapla drushtikon asto. Chaan lihila aahes !

    ReplyDelete
  2. अप्रतिम ..!!!..छान मांडलाय विषय !

    ReplyDelete

Contact Form

Name

Email *

Message *