Saturday, December 19, 2015

दिसामाजी काहीतरी...

नळस्टॉपचा चौक. सकाळची ९:३० ची वेळ. चोहीबाजुने प्रचंड traffic. SNDT पासुन चौकात पोहोचेपर्यंत ७ सिग्नल लागतात. चौकात एक पोलिस उभा असतो. एकटाच सगळं सांभाळत असतो. सिग्नल मोडणाऱ्यांपासुन ते अडखळणाऱ्या पादचाऱ्यांपर्यंत, राँग साईडने जाणाऱ्यांपासुन ते कर्कश हॉर्न वाजवणाऱ्यांपर्यंत. रणरणत्या उन्हात घामाच्या धारा टिपत तो त्याचं काम करत असतो. इतक्यात त्याला चक्कर येते. तो चौकातच जमीनीवर कोसळतो. अचानक सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं. तेवढ्यात एक तरुण गाडीवरुन उतरतो. हातात पाण्याची बाटली घेऊन धावतच पोलिसाकडे जातो. त्याला सावरायला मदत करतो. सिग्नलला उभा असलेला मी हे सगळं पाहत असतो. स्तब्धपणे. सुन्नपणे. तेवढ्यात सिग्नल सुटतो पण डोक्यातले विचार तसेच राहतात. कधीही न पुसले जाण्यासाठी...

स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गर्दी. 'सचिन... सचिन...' असा जयघोष. त्याचा एक look मिळवण्यासाठी धडपडणारे हजारो जण. हसऱ्या चेहऱ्याने गर्दीतुन वाट काढणारा सचिन प्रत्येकाकडे लक्ष देण्याच्या प्रयत्नात. कोणाला Autograph तर कोणाला selfie, तर कोणाला फक्त एक मनमोकळं smile. प्रत्येकाची हृदयाची धडधड वाढलेली, उत्कंठा शिगेला पोहोचलेली. मीही त्याच गर्दीतला एक भाग. ह्यातलंच काहीतरी मिळावं म्हणुन धडपडणारा. अचानक सचिन माझ्याजवळ येतो. त्या धडधडणाऱ्या हृदयाची धडधड जणु overflow व्हायच्या मार्गावर. श्वास रोखलेला आणि अवाक चेहरा. आपसुक हात उंचावतो, तोंडातुन कसंबसं "self..." इतकंच बाहेर पडतं. बाकीचं सगळं फोनच बघुन घेतो. मी फक्त त्या क्षणाचा आनंद घेत असतो, अगदी मनापासून...

संध्याकाळची वेळ. टेकडीवरचा तो एकाकी रस्ता, बोचरा वारा आणि मावळतीच्या सूर्याला काही तासांसाठी निरोप देणारे ते हजारो वृक्ष. जवळच वाहणारा तो नितळ झरा, त्याच्या पाण्याला स्पर्शुन परावर्तीत होणारे ते दिवसातले शेवटचेच काही सूर्यकिरण, घरट्यात परतण्याच्या लगबगीत असलेले पक्षीगण आणि मी. माझ्या अस्तित्वाने काहीही फरक न पडणाऱ्या जगाचे कानोसे घेत फिरणारा मी. हरवलेलं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करणारा मी, सापडलेलं काहीतरी कवटाळण्याचा प्रयत्न करणारा मी. स्तब्ध. शांत. अवाक् आणि विचाराधीन.

आयुष्य हे जणु अनुभवांचं भांडारच असतं. अशा भांडारातून वेचलेल्या निवडक मौल्यवान गोष्टी लेखणीबद्ध करणं हा अजुन एक विलक्षण अनुभव. कधी वर्णन केलेले प्रसंग हे खरे असतात, तर कधी वरच्यासारखे काल्पनिक. काल्पनिक प्रसंगांना परिस्थितीजन्य ज्ञानावर आधारित मुलामा चढवणं, हे लेखकाचं कौशल्य.

आपल्या रोजच्या आयुष्यात बरेच उल्लेखनिय प्रसंग घडत असतात. प्रत्येकवेळी आपण हे अनुभव दूसऱ्याबरोबर शेअर करतोच असं नाही. कधी सांगण्यासारखी व्यक्ती सापडत नाही, तर कधी आपल्यालाच तो अनुभव शब्दबद्ध करता येत नाही. जरी तो अनुभव शब्दबद्ध करता आला तरी दरवेळी अनेक लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवणं हे शक्य होत नाही. मीही असाच एक. सतत काहीतरी नवीन सुचत असलेला, सतत काहीतरी नवं सांगायला उत्सुक असणारा. म्हणुनच मी हे 'असंच सुचलेलं' शेअर करण्यासाठी ब्लॉग या माध्यमाची निवड केली आहे. वर लिहीलेले ३ प्रसंग हे या ब्लॉग लेखनाची नांदीच म्हणता येतील.

एखादा ब्लॉग सुरु करावा असं जवळपास २-३ वर्षांपासून डोक्यात होतं. तसं बघायला असे अनेक विचार मनात येत असतात, आणि कालानुपरत्वे नाहीसे देखिल होत असतात. पण ब्लॉगचा विचार हा मनात कायमचाच घर करुन बसला, आणि मी नवीन ब्लॉग सुरु करण्याचा निर्णय घेतला. पहिला विचार मनात आला तो म्हणजे ब्लॉगवर काय लिहायचं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी लोकांचे ब्लॉग वाचायला सुरुवात केली. इंटरनेट वर मराठी ब्लॉग चं एक भलंमोठ विश्व आहे. यात माझ्यासारख्या 'असंच सुचलेलं' प्रकारच्या ब्लॉग पासुन ते पाककृतींवरचे ब्लॉग, पर्यटनावरचे ब्लॉग, Technical ब्लॉग, कवितांचे ब्लॉग, श्लोकांचे ब्लॉग, कथांचे ब्लॉग, ढापलेल्या साहीत्याचे ब्लॉग आणि उगाच काहीही लिहीलेल्या ब्लॉगपर्यंत सगळे प्रकार पहायला मिळतात. यातील निवडक ब्लॉग बघुन मी माझ्या ब्लॉगची रुपरेषा ठरवली.

पुढचा महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे ब्लॉगच्या नावाचा. नावाचा विचार करताना मला 'Rajat Says It All' हे नाव सुचलं, आणि एकदम आवडुनच गेलं. मध्यंतरी Facebook वर मी ह्या नावाचा Hash tag वापरला होता, Instagram वर सुद्धा #RajatClicksItAll या Hash tag चा वापर केला होता. यामुळेच कदाचित मी हे नाव लगेच फायनल करुन टाकलं. मराठी ब्लॉगला English नाव कसं वाटेल असा विचार मनात येताच मी तो झटकुन टाकला. ओढुनताणुन मराठी शब्दांचा वापर करणं मला पटत नाही. 'क्लिक करा' ऐवजी 'टिचकी मारा' म्हणणे, किंवा 'इंटरनेट' ला 'आंतरजाल' म्हणणे मला मंजूर नाही. असल्या विक्षिप्त शब्दांपेक्षा English नाव कधीही चांगलंच.

तर असा हा सगळा प्रवास करुन हा ब्लॉग मी तुमच्यासमोर आणला आहे. नवीन ब्लॉगवरची ही पहिली पोस्ट तुमच्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा प्रयत्न तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे. तरीही काही चुकलं असल्यास क्षमा मागतो, नवीन आहे मित्रांनो... 'चूक भूल देणे घेणे'.

20 comments:

 1. 'Tichki mara'? Pahilyandach aiktoy.. Daba mhanla tari chalel

  ReplyDelete
  Replies
  1. Khup thikani baghitla mi. Daba samajnyasarkha aahe. Tichki mara jara jastach hota. ;)

   Delete
 2. 'Tichki mara'? Pahilyandach aiktoy.. Daba mhanla tari chalel

  ReplyDelete
 3. Masta...lihit raha mitra...tuzya pahilya post chi waat pahtoy...

  ReplyDelete

Contact Form

Name

Email *

Message *