Sunday, January 28, 2018

Untitled Post - 3


आज सकाळी अभ्यासासाठी लवकर उठलो होतो. ५ वाजता! थोड्यावेळाने कंटाळा आला म्हणून एक ब्लॉग वाचायला घेतला. हा ब्लॉग मला फार आवडतो. ह्यावरचे जवळपास सगळेच लेख मी कित्येकदा वाचलेले आहेत पण तरी ते प्रत्येकवेळी नवीन आणि तितकेच थ्रिलिंग वाटतात. आता थ्रिलिंग ह्या शब्दाचा अर्थ साहसाशी जोडला जाऊ शकतो ह्याची कल्पना आहे मला, पण एखादी भारी गोष्ट वाचण्यातही एक प्रकारचं थ्रिल असतं.

पहाटेची वेळ होती. माझे नेहमीचे आवडते लेख होते आणि बाहेर सूर्य उगवायचा होता. डिसेंबर महिना चालू असूनही थोडाफार पाऊस होता आणि वातावरणात एकप्रकारची मंद शांतता होती. शेजारच्या घड्याळाच्या टिकटिकीने एक अनाहूत ठेका धरला होता आणि माझं मनही त्या ठेक्यावर धावत होतं. कधीकधी असं होतं ना, कि सगळं जगच इन-सिंक असतं, तसं काहीसं झालं होतं.

थोडावेळ वाचून झाल्यावर लक्षात आलं कि आपली परीक्षा चालू आहे, आणि आपल्याला आता अभ्यासाची गरज आहे. एव्हाना सूर्योदय होऊन गेला होता. पावसाचा जोरही वाढला होता. मला अचानक अभ्यास करण्याची तीव्र इच्छा झाली. मला युज्वली अभ्यास करायला फार वेळ लागतो. ह्याचा अर्थ मी स्लो लर्नर आहे असं नाही, पण त्याची २ कारणं माझ्या लक्षात आली आहेत. एकतर माझं बऱ्याचदा लक्ष नसतं, आणि दुसरं म्हणजे जेंव्हा ते असतं, मी कुठल्याही गोष्टीचा खूप खोलवर जाऊन अभ्यास करतो. ह्याचमुळे बऱ्याचदा माझा परीक्षेच्या वेळी अर्धासुद्धा सिलॅबस पूर्ण होत नाही आणि कमी मार्क पडतात.

हे मी काय लिहितोय?? मला डायरी वगैरे लिहायची नव्हती. एकतर मी रोज डायरी लिहीत नाही, आज एकदम कशाला लिहू? आणि दुसरं म्हणजे आत्ताशी सकाळ आहे. सकाळी कुणी कधी डायरी लिहितं का? पण मी माझ्या प्रत्येक कृतीचं कारण का देतोय? आणि कुणाला? हि सवय मला इंजिनीरिंगमुळे लागलीये. फक्त कारण देण्याची नव्हे, कुठलीही गोष्ट अनलाईझ करण्याची. आणि ही असली अनालिसीस असल्या लेखात आली कि ती वाचणाऱ्याला फार बोर होतात ह्याची जाणीव मला हल्लीच झालीये.

बरं बास.

No comments:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *