Monday, November 20, 2017

Untitled Post - 2

मी का दुःखात आहे? कि मी आनंदात उगाचच दुःख शोधण्याचा प्रयत्न करतोय? तसं असेल तर ते अजून वाईट आहे, कारण जीवनाचा उद्देशच जर आनंदाचा शोध असेल तर आनंदात असताना दुःख शोधणे हा करंटेपणा नाही का? की गोड जेवणात असलेलं तिखट लोणचं? वरवर पाहता मला माझ्या दुःखाचं काही कारण दिसत नाही. कदाचित मी लौकिकार्थाने दुःखी नसेनही. पण मनातून काहीतरी चुकल्यासारखं, हरवल्यासारखं वाटतं त्याचं काय?

माझ्या जीवनाकडून फार अपेक्षा आहेत का? कदाचित हो! मला जास्तीत जास्त भाषा शिकाव्याश्या वाटतात, जास्तीत जास्त राग ओळखू यावेसे वाटतात, जास्तीत जास्त programming languages शिकाव्याशा वाटतात, जास्तीत जास्त पुस्तकं किंवा ब्लॉग वाचावेसे वाटतात, जास्तीत जास्त लिहावंसं वाटतं, जास्तीत जास्त क्रिकेट बघावंसं वाटतं, जास्तीत जास्त गाणी ऐकावीशी वाटतात, जास्तीत जास्त चांगली बासरी वाजवावीशी वाटते. हे सगळं करताना आयुष्य पुढे जातच राहतं. रोज नव्या घटना घडतच राहतात. रोज अभ्यास करावाच लागतो. रोजच्या पेपरमध्ये काहीतरी नवीन असतंच. रोज कुणीतरी काहीतरी नवीन करायला सांगतं. रोज काही नवीन घडतंच असतं. त्यातल्या कित्येक गोष्टी माझ्या आयुष्याशी इतक्या बांधलेल्या असतात कि त्यातून माझी सहजासहजी सुटका होणं शक्य नसतं.

पण तरी माझ्या माझ्याकडूनच एवढ्या अपेक्षा का आहेत? का मला ह्यातली एखादीही गोष्ट सोडून द्यावीशी वाटत नाही? का मला प्रत्येक गोष्टीतला सर्वोत्तम माणूस खुणावत असतो? का मला असं वाटतं कि मी त्या उंचीला प्रत्येकच क्षेत्रात पोहोचू शकेन, जेंव्हा मला आत खोलवर कुठेतरी जाणीव असते कि मी सर्वोत्तमाच्या तुलनेत कुणीच नाही? का मी वारंवार स्वतःचे अपेक्षाभंग करून घेतो आहे? तेही हे असं करत असल्याची जाणीव असताना?

का मला ह्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं माहित नाहीत? कि माहित असून मला ते कळत नाहीए?

काहीच कळत नाही!

Contact Form

Name

Email *

Message *