Friday, January 04, 2019

आठव


परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं.

आठव!

व्वा! काय शब्द आहे!

या वाक्याचा संदर्भ पुस्तकांचा वगैरे होता. लेखकाने वाचायच्या असलेल्या पुस्तकांची एक यादी एका वहीत लिहून ठेवली होती आणि ती वही हरवली होती. तर मग त्या वहीचा आज फार 'आठव' येतोय, असं.

आपण सर्वसाधारणपणे 'आठवण येतीये' असं म्हणतो. 'आठव' हा शब्द मला 'उमाळा (दाटून) येतोय', किंवा 'हुंदका येतोय', किंवा 'हसू/रडू येतंय' अशा प्रकारचा वाटला. ह्या सगळ्या भावना आपल्याला हळूहळू, विचार करून वगैरे येत नाहीत. या अचानक येतात, अचानक नाहीश्या होतात. ह्या भावनांमागे एक ट्रिगर असतो. 'आठवण येणे' या शब्दांत जसा एक अदृश्य पसरटपणा आहे, तसा 'आठव' किंवा 'हुंदका' मध्ये नाही. ह्या भावना तीक्ष्ण आहेत, क्षणिक आहेत. आठवणींत जसे आपण रमू शकतो, तसे हुंदक्यात अनेक क्षण घालवत राहू शकत नाही. प्रसंगाचे किंवा परिस्थितीचे रूप पालटताच ही भावना नाहीशी होते. तसं काहीसं ह्या वहीच्या 'आठवा'बद्दल होत असावं. क्षणिक आणि तीक्ष्ण!

पण परत त्या वाक्यात 'फार आठव येतोय' असा शब्दप्रयोग आहे. म्हणजे लेखकाची तिथे रेंगाळण्याची, घुटमळण्याची इच्छा दिसते. तो येत असलेला 'आठव' खूप वेळ जवळ बाळगण्याची इच्छा दिसते. मग आठवण असा शब्दप्रयोग का केला नसावा?

याचं उत्तर माझ्या मते त्या वाक्याच्या संदर्भात आहे. लहानपणी बनवलेल्या पुस्तकांच्या यादीत लेखकाला फार रमायचं नाही आहे. त्या गोष्टीची आठवण काढत बसायचं नाही आहे. एखादा तीक्ष्ण, क्षणिक असा आठव येऊन ती भावना मनाच्या कोपऱ्यात परत ठेऊन द्यायची आहे. लेखात पुढे जायचं आहे.

नव्या शब्दप्रयोगाचं आपल्या मेंदूत केवळ अर्थ समजून घेऊन स्वागत न करता त्याभोवती असं घुटमळून, त्याचे रंग जाणून घेत करावं असं मला फार वाटतं. अर्थात हे सगळे प्रयत्नच असतात; कधी चुकलेले, कधी हुकलेले आणि कधी जमलेले!

Monday, September 24, 2018

मोरया!


"उरले फक्त..."
मखर
सजावट
आरास
वर्गणी
पावती
कार्यक्रमपत्रिका
मूर्ती
पेण
शाडू
सुट्ट्या
नियोजन
लगबग
धांदल
तयारी
आगमन
प्राणप्रतिष्ठापना
मंत्र
आवाहन
अथर्वशीर्ष
पाहुणे
नैवेद्य
मोदक
नमस्कार
भेटी-गाठी
वातावरण
दीड दिवस
पाच दिवस
दहा दिवस
दिवसरात्र
दर्शन
मानाचे
मनाचे
अभिमानाचे
उत्साहाचे
मंडळ
लोकमान्य
छत्रपती
"मांगल्याचे वरदान..."
देखावा
हलता
जिवंत
पौराणिक
ऐतिहासिक
सामाजिक
सोसायटी
विविधगुणदर्शन
नाटक
स्पर्धा
प्रसाद
मैत्री
नाती
आयुष्यभराची
जन्मोजन्मीची
चतुर्दशी
रथ
सजावट
रस्ता
रांगोळ्या
मिरवणूक
पथक
ढोल
ताशे
झांज
ध्वज
बरची
ताल
ठेका
नृत्य
थापी
ठोका
आवर्तन
पुनरावर्तन
परिवर्तन
उत्साह
जोश
शिस्त
समन्वय
समकृती
समकार्य
रिंगण
परिसीमा
अनुभव
याची देही
याची डोळा
सोहळा
आरती
मंत्रपुष्पांजली
विसर्जन
परतीची पावलं
हुरहूर
रिकामं मखर
शांतता

"पुढच्या वर्षी..."

Saturday, March 03, 2018

जुनं पानं


आपलेच जुने ब्लॉग काढून वाचत बसायला काय मज्जा येते!

एकतर जुन्या डायरीइतकं अस्ताव्यस्त किंवा time-specific नसतं हे, आणि साथीला लोकांच्या कमेंट्सही असतात...

Contact Form

Name

Email *

Message *