Sunday, March 27, 2016

सब'मिशन'... 'अरे देवा' पासून 'सुटलो एकदाचा' पर्यंत


"You are required to submit all your theory and practical assignments on Monday, without fail. Attendance defaulters' list has been displayed on the notice board. You must pay the fine before submitting your files."


सगळ्या कॉलेजांमध्ये थोड्याफार फरकाने होणारी ही announcement. सेमिस्टरचा सूर्य क्षितिजाकडे ढळल्यावर सुरु होणारी लगबग ही सबमिशनची असते. हा सूर्य सुखाने मावळू नये याची पुरेपुर दक्षता University ने घेतलेली असतेच, पण त्याआधी मुलांची जास्तीत जास्त वाट कशी लागेल याची काळजी ही कॉलेजं घेत असतात. ही प्रक्रिया परिपूर्ण व्हावी यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जातात. यात विविध प्रकारच्या assignments, files, journals याचा समावेश असतो. हे सगळं कमी की काय म्हणुन defaulters' list चे काही प्रकार या युद्धात उतरवले जातात. आता हा Defaulters' list काय प्रकार आहे असा प्रश्न काही अजाण वाचकांना पडला असेल. साध्या सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर Defaulters' list हा मुलांना त्यांनी केलेल्या सगळ्या पापांची आठवण रहावी यासाठी कॉलेजने केलेला एक प्रांजळ खटाटोप आहे. आता यासाठी Attendance, Timely submission of assignments, Guest lecture appearance इत्यादी सोज्वळ शब्द वापरले जातात.

Attendance कमी असल्याचं कारण पुढे करुन Defaulters' list मध्ये नाव add केलं जातं. आता आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवून ठेवलं आहे, 'कॉलेजमध्ये लेक्चर करु नये'. ते काय मूर्ख आहेत का? पण नाही! 'As per university norms, you are required to attend at least 75% lectures and 100% practicals. Institute expects students to attend 90% of the total lectures.' अशा आशयाची प्रेमपत्रे सगळ्यांच्या घरी येऊ लागतात. आता ९०% लेक्चर्स केली तर समाजात एखाद्याची किती बेअब्रू होईल? पण या अब्रूनुकसानीची कॉलेजला पर्वा नसते. ते कमी attendanceवाल्यांची Defaulters' list लावून मोकळे होतात, आणि सबमीशनच्या आधी अजुन एक भूत मुलांच्या डोक्यावर येऊन बसतं.

बरं हे सगळं इथेच थांबतं असं नाही. या Defaulters' list च्या भूतावर उतारा म्हणुन Department च्या चरणी fineची दक्षिणा अर्पण करावी लागते. ही दक्षिणा अर्पण करण्याची प्रक्रिया ही देखिल दोन-पाचशे रुपये देणे व रिसिट मिळवणे इतकी साधी नसते. आधी Defaulters' list मधलं आपलं नाव शोधण्याची कसरत करावी लागते. बर, या list चे फोटो काढून इतरांचा त्रास कमी करावा, तर तेही कॉलेजला पसंत नसतं. प्रत्येकाने येऊन त्या list मधलं नाव शोधून आपला आकडा जाणून घ्यायचा असतो. तो आकडा कळल्यानंतर समोरच्या शिक्षकाकडून, 'तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती' पासून 'तू आपल्याच कॉलेजमध्ये शिकतोस का रे?' पर्यंतचे सर्व टोमणे सहन करायचे असतात. (टोमणे ऐकले म्हणजे fine मधून सूट मिळाली असा अर्थ अज्ञांनी कृपया काढू नये. Fine भरणे हे विद्यार्थ्याचे प्राक्तन असते.) टोमणे ऐकून झाल्यावर fine भरण्याच्या ठिकाणाकडे प्रस्थान करावे लागते.

तिथे सर्वसाधारणपणे आपल्याला सकाळी दात घासायला लागलेला ५ सेकंदांचा जास्तीचा वेळ, गाडीला मारायला लागलेल्या (तब्बल!) ३ किका, कॉलेजच्या पार्किंगमध्ये आपल्या सुंदर मैत्रिणीबरोबर फक्त 'Hi' करण्यासाठी घालवलेला १३ सेकंदांचा वेळ, ही सगळी विलंबस्थळे आठवावीत इतकी मोठी रांग असते. ती रांग बघुन आपल्याला दोन-अडिच तासांनंतरचं घड्याळ दिसू लागतं. एकाच दिवसात fine भरणे व सबमीशन करणे ही दोन कामं असल्याने आपण अस्वस्थ होतो. आपली नजर आता एखादा मित्र शोधत असते. आपल्या पुढे उभा आहे या एकाच qualification वर आपल्याला एखादा पोरगा आपला जीवश्च कंठश्च मित्र वाटु लागतो. भले गेल्या दोन-अडिच वर्षात आपण त्याचं तोंडही बघितलेलं नसेना का, त्याच्या जवळची जागा आपल्या मैत्रीचा दुवा बनते.

"अरे, रुपेश! काय म्हणतोस? इथे कसा काय? Attendance कमी वाटतं तुझा पण..." आपण हसण्याचा आटोकाट प्रयत्न करत बोलतो.
पण अशा वेळी बरोबर येईल तो अंदाज कसला?
"अरे रुपेश नाही रे, दिपक. तुझं बोल, तू काय म्हणतोस?"
बोंबला. म्हणजे नावही चुकलं.
मी असलेलं नसलेलं सगळं अभिनय कौशल्य पणाला लावुन कसा Slip of Tongue झाला हे पटवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं 'दिपक' हे नाव कसं अगदी तोंडावरच होतं ते सांगु बघतो. एरवी त्याने 'दिपक' ऐवजी 'दिपीका' जरी सांगीतलं असतं तरी मी हेच केलं असतं याची मनोमन खात्री पटते. Meanwhile आपल्या येण्याचा नेमका उद्देश त्यालाही कळलेला असतो. तो आपल्याला जागा करुन देतो. रांग पुढे सरकत राहते. २ तासांचा अंदाज सपशेल चुकुन एव्हाना दुपार झालेली असते. Fineचे पैसे घेऊन आपल्या हातात रिसीट कोंबली जाते.

आता आपल्याला सबमिशन करायचं असतं. सबमिशनसाठी आपल्याला दारोदार कसं फिरावं लागेल याची सोय कॉलेजने आधीच करुन ठेवलेली असते. प्रत्येक file साठी वेगळं ठिकाण आणि वेगळी गर्दीसुद्धा. सगळ्यात कमी गर्दी कुठे हे शोधण्याचा आपला प्रयत्न फोल जातो आणि आपण एखाद्या रांगेत दाखल होतो. मित्र शोधून घुसण्याची कला तमाम विद्यार्थी वर्गाला अवगत असल्याने वेळेबरोबर आपल्या पुढची रांग कमी होण्याऐवजी वाढत जाते. अखेर कसंतरी आपण सरांपर्यंत पोहोचतो, आणि सरांना कोणाचा तरी फोन येतो (किंवा लंच टाईम होतो, किंवा शिपाई बोलवतो, किंवा त्यांनाच कंटाळा येतो. यातलं काहीतरी आपल्याच वेळी होणं हे जणु गरजेचंच असतं.) सरांनी आपली फाईल हातात घेईपर्यंतचा वेळ (वेळ हा फारच क्षुल्लक शब्द आहे. 'कालखंड' वगैरे बरोबर वाटतंय. नाही?) जाता जात नाही. अखेर आपल्या मुखकमलावर जाणीवपूर्वक तिरस्करणीय भाव उमटवून, आपल्या फाईलला मोक्ष दिला जातो.

ह्या सगळ्याचा प्रत्येक विषयासाठी repeat telecast घडवला जातो. काही वेळा आतल्या कागदपत्रांचा (म्हणजे index पासून (प्रचंड खपून; अहोरात्र कष्ट वगैरे करुन लिहीलेल्या) assignments पर्यंत सगळं) उद्धार केला जातो.

'इतकं कोण बघतंय?', 'एखादं चालतं राहीलेलं', 'सगळ्या प्रिंटस् सेमच दिसतात, काही नाही कळत कुणाला' हे सगळं (आदल्या दिवशीचं) शहाणपण अंगाशी यावं अशी परिस्थिती निर्माण होते. थोड्या शिव्या खाऊन व काही(शे) कटाक्ष पचवून झाल्यावर आपली सुटका होते.

अखेर दिवसभराच्या अथक प्रयत्नांती सबमिशनचं शिवधनुष्य उचलण्यात आपण यशस्वी होतो. पुढच्या semester ला परत येणार हे माहीत असुनही सबमिशनच्या या राक्षसाला वाकुल्या दाखवत आपण त्याचा निरोप घेतो.

Contact Form

Name

Email *

Message *