Tuesday, May 10, 2016

ग्रेस...!!



कवी ग्रेस यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या चपखल शब्दांच्या आणि गूढ अर्थाच्या कवितांचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलंय. 'ग्रेस' या नावाने अजरामर कविता लिहिणाऱ्या या कवीचं खरं नाव 'माणिक गोडघाटे'. आजच्या दिवशी त्यांच्या एखाद-दोन कविता इथे लिहाव्या असं वाटलं म्हणून हि Blog-Post.


'या व्याकुळ संध्यासमयीं' आणि 'पाऊस कधीचा पडतो' ह्या माझ्या खूप आवडत्या कविता आहेत. ग्रेसांच्या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा अर्थ. प्रत्येक वाचनात नवा अर्थ उलगडणाऱ्या या कविता मला म्हणूनच आवडतात.


या व्याकुळ संध्यासमयीं
शब्दांचा जीव वितळतो.
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें
मी अपुले हात उजळतो.

तू आठवणींतुन माझ्या
कधिं रंगित वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधिं असते माझ्यापाशीं...

पदराला बांधुन स्वप्‍नें
तू एकट संध्यासमयीं,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेई...

तू मला कुशीला घ्यावें
अंधार हळू ढवळावा.....
संन्यस्त सुखाच्या काठीं
वळिवाचा पाऊस यावा !


वरवर पाहता संध्याकाळचं वर्णन आहे असं वाटणारी हि कविता खरंतर आयुष्याचा अर्थच सांगून जाते. कितीही वाचली तरी आपलं मन अतृप्त ठेवणारी अजून एक कविता म्हणजे 'पाऊस कधीचा पडतो'. 


पाऊस कधीचा पडतो 
झाडांची हलती पाने 
हलकेच जाग मज आली 
दु:खाच्या मंद सुराने 

डोळ्यात उतरले पाणी 
पाण्यावर डोळे फिरती 
रक्ताचा उडला पारा 
या नितळ उतरणीवरती 

पेटून कशी उजळेन 
हि शुभ्र फुलांची ज्वाला 
तार्‍यांच्या प्रहरापाशी 
पाऊस असा कोसळला 

सन्दिग्ध घरांच्या ओळी 
आकाश ढवळतो वारा 
माझ्याच किनार्‍यावरती 
लाटांचा आज पहारा



आपल्या कवितांबद्दल बोलताना ग्रेस एकदा म्हणाले होते कि, 'माझ्या कविता एखाद्या स्वगतासारख्या आहेत. मुळात स्वगतात अस्तित्वाच्या जाणीवेचा अभाव असतो. त्याला श्रोत्यांच्या अस्तित्वाची गरज नसते, किंवा ते आहेत याचं भानही नसतं. मी एक असा कवी आहे जो भाषेत नव्या शब्दांची निर्मिती करायलाही मागेपुढे पाहत नाही.' 



Image Source - Internet



ग्रेसांच्या कविता दुर्बोध आहेत. या कवितांचा अर्थ सामान्य माणसाला लवकर उमजत नाही. पण यामुळेच ग्रेसांच्या कविता स्पेशल ठरतात, वाचकाच्या मनात एक गहिरा तरंग उमटवून जातात.

Contact Form

Name

Email *

Message *